मुंबई : गेल्या आठवड्यात फुकेत – नवी दिल्ली एअर इंडियाचे विमान हवेत पुरेशा उंचीवर असताना अचानक ३०० फूट खाली आले. या घटनेमध्ये दोन्ही वैमानिकांची अमली पदार्थ, नशेसंबंधी पदार्थांचा शोध घेण्यासाठी (सायोकॲक्टिव सबस्टन्स स्क्रीनिंग टेस्ट) चाचणी केली होती. चाचणीत, मुख्य वैमानिकाची अधिक सखोल तपासणी आवश्यक असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर, दोन्ही वैमानिकांना तपास पूर्ण होईपर्यंत सेवेबाहेर ठेवण्यात आले आहे. दरम्यान, काही प्रवाशांनी प्रवासादरम्यान वैमानिक नशेत असल्याची किंवा मानसिकरित्या सक्षम नसल्याची शंका व्यक्त केली आहे. यामुळे विमान कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
फुकेतहून नवी दिल्लीला जाताना एअर इंडियाचे ‘एआय ३२०’ विमान अचानक ३०० फूट खाली आले आणि त्यानंतर स्थिर झाले. यामध्ये ४ विमान कर्मचारी आणि १३ प्रवासी जखमी झाले होते. या विमानामध्ये तीन लहान मुलांसह १३७ प्रवासी, तसेच दोन वैमानिक आणि सहा कर्मचाऱ्यांचा (केबिन क्रू) समावेश होता. विमान अपघात तपास विभाग या घटनेचा तपास करत आहे. यात वैमानिकांच्या चाचणीनंतर अधिक तपासाची गरज असल्याचे समोर आले. त्यामुळे हे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तपासणीचा अंतिम अहवाल अद्याप आलेला नाही.
‘रँडम डोप चाचणी’ अनिवार्य
विमान उड्डाण सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी डीजीसीएने २०२२ मध्ये विमान कर्मचारी, एटीसी आणि देखभाल कर्मचाऱ्यांसाठी ‘रँडम डोप चाचणी’ (अचानक केलेली अमली पदार्थांची तपासणी) नियम अनिवार्य केला. याद्वारे कर्मचारी उड्डाणादरम्यान किंवा कामावर असताना कोणत्याही मद्य किंवा मादक द्रव्यांच्या प्रभावाखाली नाहीत हे तपासले जाते.
यापूर्वी घडलेल्या काही घटना
– ११ नोव्हेंबर २०१८ रोजी नवी दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या (एआय-१११) उड्डाणापूर्वी, वरिष्ठ वैमानिक अरविंद कथपालिया दोन वेळा ब्रेथ अनालाइजर (अल्कोहोल) चाचणीत दोषी आढळले होते. यामुळे विमानास विलंब झाला होता. या प्रकरणी डीजीसीएने अरविंद यांचा परवाना तीन वर्षांसाठी निलंबित केला होता. – जेट एअरवेज आणि स्पाइस जेटचे अनेक विदेशी आणि भारतीय वैमानिक २०१५-१९ दरम्यान अल्कोहोल चाचणीमध्ये दोषी आढळले होते.
– २०१९मध्ये अल्कोहोल चाचणीत १९ वैमानिक दोषी आढळले होते. त्यांना कामावरुन काढण्यात आले होते. – २०२२ मध्ये सुमारे ४१ वैमानिक अनिवार्य अल्कोहल चाचणीत दोषी आढळले होते.
