मुंबई : टाटा समूहाच्या एअर इंडिया एक्स्प्रेस आणि एअर इंडिया ग्रुपमधून अनुभवी वैमानिक मोठ्या प्रमाणावर नोकरी सोडत आहेत. यामुळे एअरलाईन पायलट्स असोसिएशन ऑफ इंडिया (ALPA India) या वैमानिकांच्या संघटनेने टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांना पत्र पाठवून अनुभवी वैमानिकांनी कंपनी सोडणे हा केवळ कर्मचारी व्यवस्थापनाचा किंवा मनुष्यबळाचा विषय नसून, थेट विमानाच्या सुरक्षिततेशी जोडला असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे.

अपेक्षेप्रमाणे न वाढलेले वेतन, भत्त्यांमध्ये झालेली कपात आणि कामाच्या ढासळत्या परिस्थितीमुळे वरिष्ठ कमांडर आणि वैमानिक नोकरी सोडत आहेत. वरिष्ठ वैमानिक हे केवळ विमान उडवत नाहीत, तर ते नवीन वैमानिकांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शनही करतात. त्यांच्या जाण्यामुळे विमान कंपनीच्या सुरक्षिततेवर आणि कामकाजावर ताण येत आहे. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेस विमान कंपनीत एकूण ५ हजार वैमानिक कार्यरत आहेत.अनुभवी वैमानिक गेल्यास नवीन वैमानिकांना प्रशिक्षण देणे, त्यांना मार्गदर्शन करणे आणि विमान ऑपरेशन्स योग्य रीतीने सांभाळणे कठीण होते, त्यामुळे सुरक्षेचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच याचा येत्या काळात विमानाच्या वाहतुकीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

वैमानिकांनी नोएल टाटा यांच्याकडे या विषयात मध्यस्थी करण्याची मागणी केली असून योग्य वेतनश्रेणी, स्थिर रोस्टर (कामाचे वेळापत्रक) आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार वैमानिकांच्या कामाचे तास, स्पर्धात्मक वेतन आणि थकवा व्यवस्थापन यावर योग्य तो तोडगा काढण्याची विनंती केली आहे. टाटा समूहाने एअर इंडियाचे नियंत्रण हाती घेतल्यापासून विमान कंपनीच्या विस्ताराचे काम सुरू आहे, मात्र वाढत्या राजीनाम्यांमुळे व्यवस्थापनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

ऑगस्ट महिन्यात दोन्ही विमान कंपन्यांनी वैमानिकांच्या पगारात सुमारे ९-१५ टक्के वाढ केली. त्याचबरोबर, एअर इंडिया एक्स्प्रेसमध्ये जाण्यास इच्छुक वैमानिकांसाठी १० लाख ते २१ लाख रुपयांचा एक-वेळ बदली भत्ता देखील सुरू केला. विमान कंपनी सुमारे ४० बोईंग ७३७ मॅक्स विमानांचा समावेश करण्याच्या तयारीत असल्याने, कॉकपिटमधील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले. ऑक्टोबर २०२६ पासून तीन हप्त्यांमध्ये सिनियर कमांडर आणि कमांडर यांच्यासाठी २१ लाख रुपयांपर्यंतच्या, तर सिनियर फर्स्ट ऑफिसर यांच्यासाठी १० लाख रुपयांपर्यंतच्या बोईंग ७३७ विमानांचा ताफा देणाऱ्या सुधारित पॅकेजनंतरही वैमानिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

प्रमुख मागण्या

अधिक स्पर्धात्मक वेतन संरचना, सेवानिवृत्ती आणि दीर्घकालीन आर्थिक लाभ,विमान ताफ्याच्या संक्रमण कार्यक्रमादरम्यान वैमानिकांचे संरक्षण, स्थिर रोस्टरिंग पद्धती,योग्य रजा धोरणे,संरक्षित विश्रांती कालावधी, थकवा-जोखीम व्यवस्थापन प्रणाली,उड्डाणांसाठी बिझनेस-क्लास प्रवास, सुरक्षा अहवाल प्रणाली,धोरणात्मक बदल लागू करण्यापूर्वी औपचारिक सल्लामसलत.