मुंबई : येत्या काही महिन्यात नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू होऊन दररोज अंदाजे ५० हजार प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज आहे. तर दुसरीकडे मात्र एअर इंडिया विमान कंपनीने उच्च दर, अपुरी कनेक्टिव्हिटी आणि दुहेरी विमानतळ संचालनामुळे (वाहतुकीमुळे) वाढणाऱ्या खर्चाचे कारण देत नवी मुंबई विमानतळावरून वाहतूक सुरू करण्यास असमर्थता दर्शविली आहे.
नवी मुंबई विमानतळ २५ डिसेंबर २०२५पासून प्रवासी सेवेत आले. टाटा समूहाच्या एअर इंडिया विमान कंपनीने देशातील सर्वात मोठ्या ग्रीनफिल्ड नवी मुंबई विमानतळावरून विमान वाहतूक सुरू करण्याबाबत भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाकडे चिंता व्यक्त केली आहे. तसेच सध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरूनच (मुंबई विमानतळ) विमानांची वाहतूक सुरू ठेवण्यास पसंती दर्शविली आहे. थोडक्यात सध्याच्या परिस्थितीत नवी मुंबई विमानतळावरून विमान वाहतूक सुरू करणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर नसल्याचे मत एअर इंडिया विमान कंपनीचे आहे. सध्याचे मुंबई विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू असल्याने, विमान कंपन्या लगेच नवी मुंबईत स्थलांतरित होण्यास उत्सुक नसल्याचे मत देखील एअर इंडियाने मांडले. एअर इंडियाच्या या भूमिकेमुळे, नवी मुंबई विमानतळावर विमान कंपन्यांचे स्थलांतर धीम्या गतीने होण्याची शक्यता आहे.
विरोधाची मुख्य कारणे
खर्च आणि कार्यक्षमता : मुंबई विमानतळावरून आणि नवीन नवी मुंबई विमानतळावरून एकाच वेळी विमाने चालवल्यास मनुष्यबळ, ग्राउंड हँडलिंग आणि सपोर्ट सिस्टमची गरज दुप्पट होईल, ज्यामुळे खर्च वाढतो.
जास्त विमानतळ शुल्क : अदानी समूहाद्वारे विकसित केल्या जाणाऱ्या नवी मुंबई विमानतळावर लँडिंग चार्जेस नोएडा विमानतळाच्या तुलनेत देशांतर्गतसाठी ८४ टक्के आणि आंतरराष्ट्रीय ११३ टक्के जास्त असू शकतात.
अपुरी कनेक्टिव्हिटी : नवी मुंबई विमानतळापर्यंत प्रवाशांसाठी योग्य मेट्रो किंवा रस्ते कनेक्टिव्हिटी उपलब्ध नसल्याने, बहुतांश प्रवासी मुंबई विमानतळालाच प्राधान्य देतात. विशेषतः पश्चिम मुंबईतील प्रवाशांना नवी मुंबईत पोहोचणे अवघड होते.
टर्मिनल १ चा गोंधळ: मुंबई विमानतळावरील टर्मिनल १ बंद करण्याबाबत स्पष्टता नसल्याने, नवी मुंबई विमानतळावरून वाहतूक सुरु करणे कठीण आहे.
वैमानिक, हवाई सुंदरीसह इतर कर्मचारी मोठ्या संख्येने पश्चिम उपनगरातील वांद्रा, अंधेरी, सांताक्रुझ, खार, कांदिवली परिसरात राहतात. वैमानिकांना देशांतर्गत विमानासाठी किमान एक आणि आंतराराष्ट्रीय विमानाकरिता दीड तास आधी विमानतळावर हजर रहावे लागते. हवाई सुंदरीला दोन तास आधी यावे लागते. या कर्मचाऱ्यांना सकाळी १० वाजता उड्डाण करणाऱ्या विमानासाठी तयार होऊन सकाळी ७ वाजता घर सोडावे लागेल. ९-१० तासांचे काम करून कर्मचारी रात्री ९ वाजता परतले, तर ते घरी कधी जाणार. कर्मचाऱ्यांप्रमाणेच प्रवाशांना देखील नवी मुंबई विमानतळ गाठण्यासाठी किमान दोन ते अडीच तासांचा कालावधी लागतो. त्यातच प्रत्येक प्रवाशाकडे सामान असते. त्यामुळे त्याला खासगी गाडीशिवाय पर्याय नाही. परिणामी, जोपर्यत नवी मुंबई विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम वाहतूक व्यवस्था निर्माण होत नाही, तोपर्यत विमान कंपन्या येथून विमान सेवा चालविण्यास टाळाटाळ करतील. – कॅप्टन अभिजित अडसूळ, माजी वैमानिक (जेट एअरवेज)
सध्या कोणत्या विमान कंपन्यांची सेवा
एअर इंडिया एक्स्प्रेस, इंडिगो, स्टार एअर, अकासा एअरची बेंगळुरू, दिल्ली, गोवा–मोपा, कोची, अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, कोइंबतूर, हैदराबाद, जयपूर, कोची, लखनौ, मंगळुरू, नागपूर, वडोदरा, कोल्हापूर, नांदेडकरिता विमान सेवा सुरू आहे.
