मुंबई : एअर इंडिया विमान कंपनीला बिझनेस क्लास आणि इकॉनॉमी क्लाससाठी ‘स्कायट्रॅक्स ४-स्टार एअरलाइन रेटिंग’ मिळाले आहे. विमान ताफ्याचे आधुनिकीकरण, उत्पादनातील सुधारणा, डिजिटल नवोपक्रम, प्रत्यक्ष जमिनीवरील अनुभव आणि सेवा संस्कृतीतील सुधारणा यांसारख्या अनेक बाबीमुळे एअर इंडियाला ३-स्टारवरून ४-स्टार दर्जा मिळाला आहे.
‘स्कायट्रॅक्स’ ही जगातील अग्रगण्य आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक मानांकन संस्था आहे. या संस्थेमार्फत दिले जाणारे स्टार रेटिंग्स विमान कंपन्यांच्या गुणवत्तेसाठी जागतिक मापदंड म्हणून ओळखले जातात. ४-स्टार एअरलाइन रेटिंग हे ग्राहकांच्या संपूर्ण प्रवासादरम्यान उत्पादन आणि सेवा या दोन्हीमध्ये मजबूत, सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या विमान कंपन्यांना दिले जाते. एअर इंडियाचा नेट प्रमोटर स्कोअर ७० पेक्षा जास्त अंकांनी सुधारला आहे. २०२२ च्या अखेरीस एअर इंडियाचा नेट प्रमोटर स्कोअर – ३५ वरून आज जवळपास ४० पर्यंत पोहोचला आहे. एअर इंडियाच्या प्रमुख ए ३५० आणि बी ७८७-९ विमानांवर, नेट प्रमोटर स्कोअर सातत्याने ६० च्या वर असतो.
‘स्कायट्रॅक्स’कडून मिळालेले हे ४-स्टार मानांकन, एअर इंडियाला अधिक आधुनिक आणि ग्राहक-केंद्रित एअरलाइनमध्ये रूपांतरित करण्याच्या प्रगतीची एक महत्त्वाची पोचपावती आहे. हे यश एअर इंडियाच्या २४ हजांराहून अधिक कर्मचाऱ्यांच्या कठोर परिश्रमाचे प्रतीक आहे. – कॅम्पबेल विल्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक, एअर इंडिया.
