मुंबई : एअर इंडिया आपल्या देशांतर्गत आणि अल्प-अंतराच्या (२ तासांच्या) आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर तिकीट बुक करताना जेवणाचा पर्याय ‘अनबंडल’ (ऐच्छिक) करण्याच्या विचारात आहे. प्रवाशांची जेवण न निवडल्यास प्रति तिकीट सुमारे २५० ते ३०० रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. ही सुविधा पुढील १-२ महिन्यांत लागू होण्याची शक्यता आहे. एअर इंडिया ‘लाइट’ भाडे श्रेणी सुरू करण्याच्या विचारात आहे.
अमेरिका, इस्रायल – इराण यांच्यातील तणावाचा फटका हवाई वाहतुकीला बसला आहे. वाढता खर्च कमी करण्यासाठी एअर इंडिया प्रवाशांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. एअर इंडियाने प्रवाशांना स्वस्त तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी देशांतर्गत आणि कमी अंतराच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये जेवणाचा पर्याय आता बंधनकारक केलेला नाही. त्यामुळे जेवणाविना प्रवाशांना तिकीट बुक करता येईल. या निर्णयामुळे प्रवाशांना आधीच्या तुलनेत तिकीट कमी किंमतीत मिळू शकेल.
एअर इंडिया ‘अनबंडलिंग’ (सुविधांना वेगळे ठेवणार) प्रक्रिया लागू करणार आहे. यामुळे प्रवाशांना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा मिळू शकतील. एअर इंडिया केवळ इकोनॉमी क्लाससाठी, नव्हे तर बिझनेस क्लासच्या प्रवाशांसाठीही बचत करण्याचा पर्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. एअरलाइन लाऊंज ॲक्सेसही तिकिटापासून वेगळे करण्याचा विचार एअर इंडियाकडून केला जात आहे. मेट्रो विमानतळावर लाऊंज संचालक सरासरी ११०० ते १४०० रुपये प्रति प्रवासी शुल्क आकारले जाते. अनेक बिझनेस प्रवासी थेट उड्डाणाच्या वेळी विमानतळावर पोहोचतात. त्यामुळे ते लाऊंजचा वापर करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना विना लाऊंज सुविधेचे स्वस्त तिकीट खरेदी करण्याचा पर्याय मिळू शकतो.
१५० आंतरराष्ट्रीय विमानांची कपात
तोटा कमी करण्यासाठी एअर इंडियाने मे महिन्यात जवळपास १५० आंतरराष्ट्रीय उड्डाणांची कपात केली आहे. या कपातीमध्ये दिल्ली, मुंबईसह अहमदाबादसह अन्य विमानतळावरून अमेरिका आणि युरोपला जाणाऱ्या विमानांचा समावेश आहे.
