मुंबई : एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक टेवोल्डे गेब्रेमॅरियम यांनी आपल्या पहिल्याच टाऊन हॉल बैठकीत एअरलाइन्स समूहासाठी ”सुरक्षा, विश्वसनीयता आणि नफा” या तीन महत्त्वाच्या प्राधान्यक्रमांची (त्रिसूत्री) घोषणा केली आहे. एअर इंडियाच्या परिवर्तनाचा हा नवा टप्पा असून, शिस्तबद्ध आणि शाश्वत वाढीसाठी ही त्रिसूत्री लागू करण्यात आली आहे.

एअर इंडियाचे जगभरात २४ हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. प्रवाशांची सुरक्षा हे विमान कंपनीचे सर्वात पहिले आणि महत्त्वाचे कर्तव्य आहे. मागील काही काळातील तांत्रिक चुका आणि विमानांच्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर, एअर इंडियाने आपली ‘सुरक्षा-रिपोर्टिंग संस्कृती’ अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. वैमानिक आणि क्रू मेंबर्सच्या सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

जागतिक आव्हाने आणि भू-राजकीय तणावाच्या काळातही एअर इंडियाच्या सेवा वेळेवर आणि विश्वासार्ह असण्यावर भर दिला जाणार आहे. एखाद्या संकटामुळे किंवा तांत्रिक कारणामुळे विमानाची वाहतूक खंडित झाल्यास, ग्राहकांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी अत्यंत वेगाने सेवा पूर्ववत करण्यावर काम केले जाणार आहे.

दीर्घकालीन स्पर्धात्मकता सुधारण्यासाठी प्रयत्न

विमानतळावरील अनुभव, केबिनची स्वच्छता आणि बॅगेज सेवा अधिक पारदर्शक व जागतिक दर्जाची बनविण्यात येणार आहे. कंपनीचे उत्पन्न वाढवणे आणि अनावश्यक खर्च कमी करणे या दोन्हींमध्ये समतोल साधण्यात येणार आहे. तोट्यातून बाहेर येण्यासाठी आणि भागधारकांचा विश्वास संपादन करण्यासाठी कठोर आर्थिक शिस्त पाळली जाणार आहे. दीर्घकालीन स्पर्धात्मकता सुधारण्यासाठी नेटवर्कची कार्यक्षमता वाढवणे, विमानांच्या ताफ्याचा वापर अधिक कार्यक्षम करणे आणि कामकाजात संतुलन साधणे या संधींचे एअर इंडिया सातत्याने मूल्यांकन करत आहे.