मुंबई : केंद्र सरकारने देशात नवीन ‘हब अँड स्पोक’ विमान वाहतूक मॉडेल राबविण्याचा निर्णय घेतला आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने प्रमाणित कार्यपद्धती (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स) जारी केली आहे. या योजनेअंतर्गत एअर इंडिया वाराणसी विमानतळावरून १ जूनपासून प्रायोगिक तत्वावर उड्डाण सुरू करणार आहे. देशांतर्गत विमानसेवा आंतरराष्ट्रीय स्थळांशी सुरळीतपणे जोडणे हा या प्रणालीचा मुख्य उद्देश आहे.
गेल्या काही वर्षापासून देशात हवाई प्रवासाकडे नागरिकांचा कल वाढला आहे. त्यातूनच राज्यात आणि जिल्हापातळीवर नवीन विमानतळ उभे करण्यात येत आहेत. देशात ‘उडान विमान योजने’अंतर्गत अनेक नवीन विमानतळे विकसित करण्यात येत आहेत. टियर २ आणि ३ शहरांना मेट्रो शहरांशी विमानाने जोडण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून सरकारने नवीन ‘हब अँड स्पोक’ विमान वाहतूक मॉडेलची निर्मिती केली आहे. प्रवाशांना देशांतर्गत ते आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरळीत कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने हब आणि स्पोक हवाई वाहतूक मॉडेल कार्यान्वित केले आहे. या मॉडेलअंतर्गत इमिग्रेशन आणि सामान हस्तांतरणासह देशांतर्गत ते आंतरराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ते देशांतर्गत विमानसेवा प्रवाशांसाठी अधिक सुलभ होईल. जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या देशांतर्गत नागरी विमान वाहतूक बाजारपेठांपैकी एक असलेल्या भारताला जागतिक विमान वाहतूक केंद्र बनवण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे.
हब अँड स्पोक मॉडेलमुळे, स्पोक विमानतळांवरून हब किंवा मोठ्या विमानतळामार्फत आंतरराष्ट्रीय स्थळांपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुलभ कनेक्टिव्हिटी मिळेल. एअर इंडिया १ जूनपासून वाराणसी विमानतळावरून प्रायोगिक तत्वावर हब अँड स्पोक मॉडेलअंतर्गत उड्डाणे सुरू करणार आहे. प्रवासी वाराणसीहून दिल्लीला आणि त्यानंतर लंडनला दुसऱ्या विमानाने प्रवास करतील.
आंतरराष्ट्रीय मार्गावरील भारतीय नागरिकांसाठी डिजीयात्रा नोंदणी अनिवार्य.
देशांतर्गत प्रवाशांसाठी वेब चेक-इन, ई-बोर्डिंग पासची सुविधा नाही. प्रवाशांना आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत ‘I’ आणि ‘D’ असे लिहिलेले दोन बोर्डिंग पास.
विमान कंपन्यांना आरोग्य आणि नोडल अधिकारी नियुक्ती बंधनकारक.
प्रवाशांचे हस्तांतरण सुलभ होईल.
विमान फेऱ्यांचा कालावधी कमी होईल.
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रांमधील नेटवर्क कनेक्टिव्हिटी सुधारेल.
