scorecardresearch

मुंबईकरांना दिवाळीची अशीही ‘भेट’!

लक्ष्मीपूजनाचा अपवाद वगळता या वर्षी फटाक्यांचा धूर व आवाज कमी झाल्याचा अनुभव सर्वसामान्यांनी घेतला.

दिवाळीत हवेतील प्रदूषण, आवाजाचे प्रदूषण, ८२ ठिकाणी आगी आणि शंभरहून अधिक पशुपक्षी जखमी झाल्याच्या घटना घडल्या.
हवा व ध्वनी प्रदूषण * ८२ ठिकाणी आग * १०० हून अधिक पशू-पक्षी जखमी
वर्षांतील सर्वात मोठा सण साजरा करण्याच्या काही चुकीच्या सवयींमुळे या दिवाळीत हवेतील प्रदूषण, आवाजाचे प्रदूषण, ८२ ठिकाणी आगी आणि शंभरहून अधिक पशुपक्षी जखमी झाल्याच्या घटना घडल्या. मात्र या सगळ्यांसाठी कारणीभूत ठरलेल्या फटाक्यांचे प्रमाण गेल्या काही वर्षांच्या तुलनेत कमी झाल्याने या घटनांमध्येही घट झाल्याचे दिसून आले.
लक्ष्मीपूजनाचा अपवाद वगळता या वर्षी फटाक्यांचा धूर व आवाज कमी झाल्याचा अनुभव सर्वसामान्यांनी घेतला. ध्वनी प्रदूषण व हवा प्रदूषणाच्या शास्त्रीय पाहणीतूनही या अनुभवाला पुष्टी मिळते. दिवाळीआधीच वाहनांचा धूर व बांधकामांची धूळ यामुळे खराब झालेली मुंबईची हवा लक्ष्मीपूजनानंतर आणखी बिघडली. बोरिवली, मालाड, अंधेरी, वांद्रे-कुर्ला संकुल, भांडुप, चेंबूर, वरळी, माझगाव या सर्व ठिकाणी पीएम २.५ आणि पीएम १० या सूक्ष्म कणांमध्ये वाढ झाली. हे कण श्वसनावाटे शरीरात गेल्यास फुफ्फुसाचे आजार तसेच कर्करोगाचाही धोका संभवतो. दिवाळीदरम्यान कुलाब्यातील हवाही चांगल्या प्रतवारीवरून साधारण प्रतवारीवर घसरली. मात्र दिल्लीप्रमाणे मुंबईची परिस्थिती अत्यंत वाईट झाली नाही. फटाक्यांची कमी संख्या व वाहता वारा याचा मुंबईकरांना फायदा झाल्याने सफर प्रकल्पाअंतर्गत ‘एअर क्वालिटी इंडेक्स’मध्ये दिसले.
फटाक्यांच्या आवाजाची पातळीही कमी झाल्याचे शहरातील अनेक ठिकाणी केलेल्या पाहणीतून समोर आल्याचे आवाज फाऊंडेशनच्या सुमायरा अब्दुलाली यांनी सांगितले. रात्री दहानंतर फटाक्यांचा आवाज होत असल्याच्या तक्रारी कमी आल्याचेही त्या म्हणाल्या.
गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता नेताजी सुभाष रोडवरील विल्सन जिमखान्याला आग लागली. लाकडी सामानाने पेट घेतल्याने आग भडकली होती. मात्र पहाटे अडीच वाजता ही आग विझवण्यात आली. ही आग फटाक्यांमुळे लागल्याचा संशय आहे.
फटाक्यामुळे गेल्या चार दिवसांत ८२ ठिकाणी लहान- मोठय़ा आगी लागल्या. यातील १३ आगी उंच इमारतीत लागल्या होत्या. अग्निशमन दलाकडून तत्परतेने कारवाई झाल्याने या आगींमध्ये जीवितहानी झाली नाही.

जखमी पशू-पक्ष्यांवर उपचार
फटाक्यांमुळे लहान मुले, आजारी माणसे, वृद्ध यांच्यासोबतच परिसरातील प्राणी-पक्ष्यांनाही त्रास होतो. फटाके अंगावर उडाल्याने काही प्राणी जखमी होतात, तर निव्वळ फटाक्यांच्या आवाजाने तसेच धुरानेही पक्षी बेशुद्ध पडतात. या वेळी कबुतर, कावळे, घार, चिमण्या अशा सुमारे १५ पक्ष्यांना तसेच धारावीतील दोन कुत्र्यांना परळच्या प्राणी रुग्णालयात आणले गेले.
गेल्या दहा वर्षांत जखमी प्राणी-पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. पूर्वी दिवाळीत फक्त आमच्या रुग्णालयात दीडशे- दोनशे प्राणी येत असत. मात्र आता ही संख्या घटली आहे, असे सचिव कर्नल जे. सी. खन्ना म्हणाले. शहरात अनेक ठिकाणी जखमी पशुपक्षी सापडले. प्लॅण्ड अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटीकडूनही पोपट, कबुतर आदी पक्ष्यांवर उपचार केले गेले. फटाक्यांमुळे काही भागांतील कुत्रे हरवले असून दोन सशांवरही उपचार करावे लागले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Air noise pollution alarmingly high on diwali

ताज्या बातम्या