मुंबईतील हवा बिघडली.. ; कुलाबा, माझगाव, वांद्रे-कुर्ला संकुल ‘अतिशय वाईट’ श्रेणीत

माझगाव येथे ‘पीएम १०’चे प्रमाण मध्यम स्तरावर होते; मात्र ‘पीएम २.५’चे प्रमाण ३३७ वर गेल्याने हवेचा दर्जा ‘अतिशय वाईट’ होता.

मुंबई : थंडीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईतील हवेचा दर्जा घसरला आहे. हवेत घातक सूक्ष्मकणांचे प्रमाण वाढल्याने कुलाबा, माझगाव, वांद्रे-कुर्ला संकुल, मालाड येथील हवेची गुणवत्ता मंगळवारी ‘अतिशय वाईट’ या श्रेणीत होती.

मुंबईसह राज्यातील बहुतांश ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून पावसाळी वातावरण आहे. हवेचा वेगही मंदावला असून, हवेत ‘पीएम २.५’चे (घातक सूक्ष्मकण) प्रमाण वाढले आहे. कुलाबा येथे मंगळवारी ‘पीएम २.५’चे (२.५ मायक्रोमीटर व्यासाचे अतिसूक्ष्मकण) प्रमाण ३५३ तर ‘पीएम १०’चे (१० मायक्रोमीटर व्यासाचे सूक्ष्मकण) प्रमाण २०४ होते. मालाड येथे हे प्रमाण अनुक्रमे ३२१ आणि १४७ होते. माझगाव येथे ‘पीएम १०’चे प्रमाण मध्यम स्तरावर होते; मात्र ‘पीएम २.५’चे प्रमाण ३३७ वर गेल्याने हवेचा दर्जा ‘अतिशय वाईट’ होता. वांद्रे-कुर्ला संकुल येथे ‘पीएम २.५’चे प्रमाण ३१३ तर ‘पीएम १०’चे प्रमाण २६३ होते. या सर्व ठिकाणी आज, बुधवारीही हवा ‘अतिशय वाईट’ दर्जाची असण्याची शक्यता आहे.

मोसमी पाऊस माघारी परतला असला तरी अरबी समुद्रात अधूनमधून निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे मुंबईत पावसाळी स्थिती निर्माण होत आहे. थंडीची प्रतीक्षा लांबली आहे. या काळात हवेचा वेग मंदावतो. त्यामुळे स्थानिक प्रदूषण आणि त्याच्या जोडीला परिसरातून येणारे सूक्ष्मकण येथे साचून राहतात. शिवाय दिवाळी संपल्यानंतरही तुळशी विवाहाच्या निमित्ताने फटाक्यांची आतषबाजी सुरूच राहिल्याने मुंबईतील हवेचा दर्जा ढासळला आहे.

तापमानात वाढ

मुंबईच्या तापमानात मंगळवारी मोठी वाढ दिसून आली. सांताक्रूझ येथे कमाल ३५.७ अंश सेल्सिअस, तर किमान २५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कुलाबा येथे सरासरीच्या तुलनेत २ अंशांच्या वाढीसह २४.८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले तर कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस होते.

चार दिवस पावसाची शक्यता

अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्टय़ामुळे आणखी दोन ते चार दिवस मुंबई, ठाण्यासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. आठवडय़ाअखेरीस हवामान कोरडे होईल, असा अंदाज आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Air pollution levels in mumbai air quality deteriorates in mumbai zws

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या