मुंबई : वाढती मागणी आणि इंधनाच्या दरातील वाढ यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाचे भाडे गगनाला भिडले आहेत. सध्या देशांतर्गत विविध मार्गावरील तिकिट दरात २५ ते ३० टक्यांनी वाढ झाली असून गोवा, हिमाचल, काश्मिर आणि दक्षिण भारतात पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांच्या खिशाला कात्री लागत आहे.

उन्हाळी सुट्टी सुरू झाल्याने पर्यटनासह आपल्या मूळ गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यातच विमानाने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली असून विमान प्रवासाला मागणी वाढत आहे. जूनच्या मध्यापर्यंत देशात पर्यटनाचा कालावधी असतो. उन्हाळी सुट्टीत नागरिक पर्यटनासाठी शहरी, थंड हवेच्या ठिकाणी, समुद्रकिनारी जातात. अयोध्येतील राम मंदिरामुळे पर्यटन धार्मिक व आध्यात्मिकदेखील होऊ लागले आहे. गेल्या काही वर्षांत पर्यटनाला जाण्यासाठी विमान प्रवासाकडे नागरिकांचा कल वाढला आहे. मे हा हवाई क्षेत्रासाठी वर्षभरातील सर्वाधिक प्रवासी असलेला महिना ठरतो.

मुंबईत उकाडा वाढला आहे. यामुळेच मुंबईकर या काळात थंड हवेच्या ठिकाणी पर्यटनाला जाण्यास प्राधान्य देतात. या काळात देशभरात केवळ हिमालयीन परिसर हा सर्वाधिक थंड असतो. त्यामुळेच तिकडे जाणाऱ्यांचा ओढा वाढत आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लेह-लडाख, काश्मीर ही या काळातील पर्यटन ठिकाणे आहेत. मात्र, तिकडे हवाई मार्गाखेरीज रेल्वेने किंवा अन्य वाहनाने पोहोचण्यात ३० तासांहून अधिक कालावधी लागतो. यामुळे पर्यटक विमान प्रवासाचा पर्याय निवडतात. त्यातूनच मागणी व परिणामी तिकीटदर देखील वाढते.

मुंबई-धर्मशाळा विमान तिकिट २१ हजारांच्या घरात

मुंबईहून लेहला विमानाने जायचे असल्यास त्यासाठी २४ ते २५ हजार रुपये खर्च करावे लागत आहे. उत्तराखंडमधील नैनीतालसह अन्य थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी देहराडून हे जवळचे विमानतळ आहे. त्यामुळे त्याचे तिकीटदेखील एरव्हीच्या सहा-सात हजार रुपयांऐवजी २१ हजार रुपयांच्या घरात गेले आहे. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगला जाण्यासाठी बागडोगरा विमानतळावर उतरावे लागते. त्यामुळे मुंबई-बागडोगरा विमानाचे तिकीट इतर वेळच्या पाच हजार रुपयांऐवजी आता १८ हजार रुपयांच्यावर गेले आहे. हिमाचल प्रदेशातील डलहौसी, शिमला, कुलू, मनाली अशा थंड हवेच्या पर्यटनासाठी धर्मशाळा हे एकमेव विमानतळ हिमाचल प्रदेशात आहे. तेथे पोहोचण्यासाठी ३० ते ३१ हजार रुपयांचे तिकीट काढावे लागत आहे.

मुंबईहून प्रमुख मार्गांचे तिकीटदर (हजारात)

शहर – मे महिना – इतर वेळी

श्रीनगर – २० ते २१ – ६ ते ७

लेह – २४ ते २५ – ८ ते १०

डेहराडून – १८ ते २१ – ५ ते ६

चंदीगड – १९ ते २१ ते १४ – ६ ते ७

बागडोगरा – १६ ते १८ – ५ ते ६

कौच्ची – २० ते २१ हजार – ७ ते ८ हजार

गोवा – १० ते ११ हजार – ३ ते ४ हजार

अयोध्या – ११ ते १२ हजार – ५ ते ६ हजार