मुंबई : हवाई प्रवासाच्या तुलनेत गैरवर्तनाच्या घटनांचे प्रमाण कमी असले तरी अशा उपद्रवी प्रवाशांमुळे विमान सुरक्षा धोक्यात येते. वर्ष २०२० ते वर्ष जुर्ले २०२५ दरम्यान ३७९ भारतीय प्रवाशांना विमान प्रवासाला बंदी (नो फ्लाय) घालण्यात आली आहे. आता नविन नियमानुसार विमान कंपन्या बेशिस्त प्रवाशांवर ३० दिवसांची विमान प्रवास बंदी घालू शकतात.

कोरोना संक्रमणानंतर हवाई वाहतुकीला भारतीय नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. त्यामुळे विमान प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. परंतु या वाढत्या प्रवासी संख्येत गैरवर्तन करणारे प्रवासीही आहेत. विमान प्रवासादरम्यान सुरक्षेकरिता हवाई शिस्त पाळण्याची आवश्यकता असते.

परंतु अनेक प्रवासी प्रवासादरम्यान क्रु मेबरर्सशी गैरवर्तन करणे, त्यांच्य़ावर हल्ला करणे, सह प्रवाशांना त्रास देणे, मद्यपान करुन विमानात धिंगाणा घालण्यासारखे प्रकार करतात. अशा प्रवाशांवर विमान प्रवासाकरिता बंदी घालण्यात येते. विमान प्रवासात नागरिकांना बंदी घालण्याची प्रक्रिया एअऱलाइन्स आणि प्राधिकरणांद्वारे सर्वसमावेशक तपासणीनंतर केली जाते.

नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) हवाई प्रवासादरम्यान होणाऱ्या गैरवर्तनाविरोधात कठोर ‘शून्य सहनशीलता’ धोरण लागू केले आहे. वर्ष २०२०मध्ये नो फ्लायच्या यादीतील भारतीय प्रवाशांची संख्या १० होती. ती २०२१मध्ये ६६ झाली. तर वर्ष २०२२मध्ये उद्धट प्रवाशांची संख्या ६३वर पोहोचली होती.त्यात वाढ होउन वर्ष २०२३मध्ये ही संख्या ११० होती. त्यानंतर वर्ष २०२४मध्ये ८२ आणि जुर्ले २०२५ पर्यत ४८ प्रवाशांना विमान प्रवासाला मज्जाव करण्यात आला. एअर इंडियाने सर्वाधिक प्रवाशांवर बंदी घातली आहे. तसेच विस्तारा, आकासा एअर, इंडिगो विमान कंपनीनेही बेशिस्त प्रवाशांवर कारवाई केली आहे.

नो फ्लायची कारवाई का?

शिवीगाळ, अश्लील हावभाव, मद्यपान करुन गैरवर्तन, अपमानास्पद वागणूक, लैंगिक छळ, आपत्कालीन दरवाजांशी छेडछाड करणे, लाईफ जॅकेटसारख्या सुरक्षा उपकरणांचा अनधिकृत वापर करणे, निदर्शने-घोषणाबाजी करणे. ओरडणे, सहप्रवाशांना त्रास होईल असे वर्तन (सीटच्या मागे किंवा ट्रे टेबलला वारंवार लाथ मारणे)

कोणत्या वर्षी किती प्रवाशांवर बंदी

२०२०-१०
२०२१-६६
२०२२ – ६३
२०२३-११०
२०२४-८२
२०२५-४८
एकुण-३७९