मुंबई : इंधन दरवाढ, भू-राजकीय तणाव आणि विमान कंपन्यांच्या मर्यादित क्षमतेमुळे नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) २०२६च्या उन्हाळी हंगामासाठी देशांतर्गत उड्डाणांमध्ये १२ टक्यांनी कपात केली आहे. यामुळे आठवड्याला सुमारे तीन हजार उड्डाणे कमी होणार असल्याने विमानाचे तिकिट दर वाढण्याची आणि काही मार्गांवर विमान उड्डाणे मर्यादित होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे यंदा उन्हाळ्यातील विमान प्रवास आणखी महागणार आहे.

डीजीसीएने नऊ विमान कंपन्यांसाठी २९ मार्च ते २४ ऑक्टोबर २०२६ या उन्हाळी हंगामाचे देशांतर्गत उड्डाणांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारतीय विमान कंपन्या २९ मार्चपासून सुरू झालेल्या उन्हाळी हंगामात दर आठवड्याला २२ हजार ६०० ते २३ हजार ०५० देशांतर्गत उड्डाणे चालविणार आहेत. गेल्या वर्षी, उन्हाळी हंगामात दर आठवड्याला २५ हजार ६१० उड्डाणे झाली होती.

डीजीसीएने आपल्या वेबसाइटवर २०२६ साठी विमान कंपनीनिहाय देशांतर्गत उन्हाळी वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. या वर्षीच्या उन्हाळी वेळापत्रकात उड्डाणे चालविणाऱ्या नऊ विमान कंपन्यांमध्ये एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस, इंडिगो, अकासा एअर, स्पाईस जेट, अलायन्स एअर, फ्लाय ९१, स्टार एअर आणि इंडिया वन एअर यांचा समावेश आहे. फेब्रुवारीच्या अखेरीपासून पश्चिम आशियातील भू-राजकीय तणावामुळे भारतातून दुबई, अबू धाबी, बँकॉक आणि सिंगापूरसारख्या ठिकाणांसाठीची विमान सेवा स्थगित झाली आहे. काही विमानतळांवरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे कमी झाली आहेत.

इंधनाच्या वाढत्या किंमती आणि भू-राजकीय तणाव कायम राहिल्यास, विमान कंपन्या जास्त मागणी असलेल्या आणि फायदेशीर मार्गांना प्राधान्य देऊन आपली क्षमता आणखी कमी करू शकतात. ज्यामुळे लहान शहरांमधील उड्डाणे कमी होण्याची शक्यता आहे. खर्च स्थिर झाल्यास आणि तणाव कमी झाल्यास, आर्थिकदृष्ट्या सक्षम कंपन्या हळूहळू वेळापत्रकात बदल करू शकतात.

देशांतर्गत पर्यटनाला फटका

इराण-इस्त्रायल,अमेरिका युद्धामुळे जागतिक हवाई वाहतूक विस्कळीत असल्याने यंदा नागरिकांनी आंतरराष्ट्रीय मार्गापेक्षा देशांतर्गत सहलींला पसंती दिली आहे. मात्र आता विमान संख्येत कपात झाल्याने देशांतर्गत विमान प्रवास महागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे देशांतर्गत सहलींसाठी प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.