मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्टीतील पर्यटन बहरू लागले आहे. मात्र विमान इंधनाच्या वाढलेल्या किंमतीमुळे हवाई प्रवास महागला आहे. अनेक मार्गावरील विमान तिकिटांच्या दरात २५ ते ३० टक्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक पर्यटनस्थलापर्यंत थेट विमानाने न जाता जवळच्या शहरातून विमान प्रवास आणि निम्मा प्रवास रस्ते मार्गाने करण्यास प्राधान्य देत आहेत. सध्या उत्तरेतील हवाई पर्यटन महागल्याने दिल्लीला प्राधान्य दिले जात आहे.
नागरिक मोठ्या संख्येने सहलींचे बेत आखत आहेत. मात्र ज्या शहरांना जोडणारी विमानसेवा मर्यादित प्रमाणात आहे, तिथे नुकसान भरून काढण्यासाठी तिकिटांच्या किमती वाढविण्यात आल्या आहेत.अमृतसर, चंडीगड, बरेली या शहरांपर्यंतचा हवाई प्रवास महागला आहे. परिणामी, या शहरांपर्यंत थेट विमानाने पोहोचण्याचा विचार बाजूला ठेवून प्रवासी दिल्लीपर्यंत विमान प्रवास करीत आहेत.
हिमाचल, उत्तराखंड या राज्यांमध्ये पोहोचण्यासाठी दिल्ली विमानतळ मार्गे न जाता अमृतसर, चंडीगड, आदमपूर विमानतळांचा पर्याय निवडला जात होता. मात्र या मार्गांची तिकिटे यंदाच्या सुट्ट्यांमध्ये दिल्लीच्या तुलनेत खूप महागली आहेत. इराण-अमेरिका संघर्ष आणि इंधन दरवाढीमुळे दिल्लीच्या तुलनेत इतर वेळी साधारणपणे एक हजार रुपयांनी महाग असलेला इतर शहरांपर्यतचा विमान प्रवास खर्च आता सात ते आठ हजार रुपयांनी वाढला आहे.
दिल्लीपासून उत्तरेतील इतर पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचण्यासाठी सात ते आठ तासांचा रस्तेमार्गे प्रवास करावा लागतो. इतर शहरांमधील विमानतळांनी हा प्रवास निम्म्यावर आणला होता. मात्र आता विमानाच्या तिकिटांच्या वाढलेल्या दरामुळे आता प्रतिकुटुंब केवळ एकूण प्रवास तीस ते चाळीस हजार रुपयांनी वाढल्याने दिल्लीपर्यंत विमानाने जाऊन पुढचा प्रवास रस्तेमार्गाने करण्यास प्राधान्य दिले जात आहे.
दिल्लीसाठी अनेक विमाने
दिल्लीसाठी अनेक विमानसेवा विविध कालावधीत उपलब्ध आहेत. दिल्लीसाठीचे इतर वेळी पाच ते साडेपाच हजार रुपयांचे विमान तिकिट आता नऊ ते दहा हजारांपर्यंत पोहोचले आहे. तर चंडीगड २० ते २१ हजार, अमृतसर १३ ते १५ हजार रुपयांपर्यंत तिकिट आहे. रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल असल्याने तिकिटेही मिळेनाशी झाली आहेत. त्यामुळे दिल्लीपर्यंत हवाई प्रवासाचा पर्याय निवडण्यात येत आहे.
दिल्ली विमानतळ सर्वाधिक व्यस्त
दिल्ली विमानतळ देशातील सर्वाधिक व्यस्त विमानतळ आहे. या विमानतळावर दररोज सरासरी १२०० ते १५०० पेक्षा जास्त विमानांची ये-जा होते. यापैकी सुमारे ९५० पेक्षा जास्त विमाने दररोज देशांतर्गत मार्गावर प्रवास करतात. दिल्ली विमानतळावरून दररोज सुमारे अडीच लाख प्रवासी प्रवास करतात.
