मुंबई : हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली असून दुसरीकडे प्रवाशांना प्रवासात उड्डाण – आगमनाला विलंब, विमानतळावरील गर्दीसह ‘सामाना’चा त्रास देखील सहन करावा लागत आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या अहवालानुसार, मार्च महिन्यात प्रवाशांनी नोंदवलेल्या एकूण तक्रारींपैकी ४७.१ टक्के तक्रारी या सामानाशी संबंधित आहेत. हरवलेली बॅग, उशिरा पोहोचलेले सामान, चुकीच्या हाताळणीमुळे झालेले नुकसान अशा विविध अनुभवांनी प्रवाशांना प्रवासादरम्यान मनस्ताप सहन करावा लागला आहे.
विमान प्रवासात उड्डाणातील विलंब, निकृष्ट जेवण, कर्मचाऱ्यांबरोबर वाद यासह सामानाशी संबंधित त्रासही प्रवाशांना सोसावा लागत आहे. देशांतर्गत विमान प्रवासांमध्ये मार्च महिन्यात एकूण ७ हजार ३९८ तक्रारी नोंदवल्या गेल्या. प्रत्येक दहा हजार प्रवाशांमागे सरासरी ५.१३ तक्रारींची नोंद झाली. महत्त्वाचे म्हणजे यापैकी ९९.८ टक्के तक्रारींचे निवारण झाले असले तर त्यांचे स्वरूप पाहता व्यवस्थापनात काही त्रुटी असल्याचे प्रवाशांकडून आवर्जून नमूद करण्यात येत आहे. बॅगांची हँडल तुटणे, बॅगा फुटणे, सामान हरवणे, वेळेत न मिळणे किंवा बॅगांमधील वस्तू गायब होणाऱ्या अनुभवांनी प्रवासी त्रस्त झाले आहेत.
सामानाच्या समस्येनंतर सर्वाधिक तक्रारी उड्डाणाशी संबंधित आहेत. उड्डाणात विलंब किंवा विमान रद्द होणे यांसारख्या कारणांमुळे २०.३ टक्के तक्रारी नोंदल्या गेल्या. त्यानंतर १९ टक्के तक्रारी परतावा (रिफंड) संदर्भात होत्या. ग्राहक सेवेशी संबंधित तक्रारींचे प्रमाण ५.३ टक्के असून, कर्मचाऱ्यांचे वर्तन, केटरिंग, भाडे किंवा दिव्यांग सुविधांशी संबंधित मुद्दे तुलनेने कमी आहेत.
‘अलायन्स एअर’ विरोधात सर्वाधिक तक्रारी
देशांतर्गत विमान सेवांमध्ये मार्च महिन्यात नोंदवलेल्या तक्रारींमध्ये ‘अलायन्स एअर’विरोधात सर्वाधिक ६३.७ टक्के तक्रारींची नोंद आहे. ‘इंडिगो’बाबत ५.५ टक्के तक्रारी आहे. ‘फ्लाय ९१’ आणि ‘एअर इंडिया’ समूहाच्या प्रत्येकी ३.९ टक्के तक्रारींची नोंद आहे. याउलट ‘स्पाइसजेट’ (२.५ टक्के) आणि ‘अकासा एअर’च्या (२.४ टक्के) तुलनेने कमी तक्रारी नोंदल्या गेल्या. ‘इंडियावन एअर’ मध्ये मात्र तक्रारी नगण्य असल्याचे अहवालात नमूद आहे.
तक्रारींमध्ये घट, पण आव्हान कायम
फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये सामानासंदर्भातील तक्रारींचे प्रमाण ५८.४ टक्क्यांवरून ४७.१ टक्क्यांपर्यंत घसरले असले, तरी ते अजूनही जास्त आहे. दुसरीकडे, उड्डाणातील विलंब आणि परतावा संबंधित तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. सामानासंदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रयत्न सुरू असून सामानाची हाताळणी हे विमान कंपन्यांसमोरील सर्वांत मोठे आव्हान आहे.
