मुंबई: मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण, बदलापूर, अंबरनाथ या मुख्य मार्गावरील वातानुकूलित लोकलला प्रतिसाद वाढत आहे. मात्र सीएसएमटी ते पनवेल, गोरेगाव या हार्बरवरील १६ फेऱ्यांना अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे हार्बरवरील लोकल सेवा बंद करून त्या फेऱ्या मुख्य मार्गावर चालवण्याचा विचार मध्य रेल्वे करीत आहे.
पश्चिम रेल्वेपाठोपाठ मध्य रेल्वेने सीएसएमटी-कल्याण, तसेच ठाणे-पनवेल ट्रान्स हार्बर व सीएसएमटी-पनवेल हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल चालवण्यास सुरुवात केली. ठाणे-पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावर वातानुकूलित सेवेला अल्प प्रतिसाद मिळाल्याने या मार्गावरील लोकल फेऱ्या काही महिन्यांपूर्वी बंद करण्यात आल्या. तर सीएसएमटी ते पनवेल, गोरेगाव दरम्यानच्या ३२ वातानुकूलित लोकल फेऱ्यांपैकी १६ फेऱ्याही बंद करून त्याऐवजी सामान्य फेऱ्या चालवण्यास सुरुवात केली. याशिवाय १९ फेब्रुवारी सीएसएमटी ते कल्याण या मुख्य मार्गाबरोबरच वातानुकूलित लोकल अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळासाठीही सुरू केल्या. हे बदल होत असतानाच हार्बरवरील उर्वरित १६ फेऱ्याही बंद करून त्या मुख्य मार्गावर वळवण्याचा विचार सुरू आहे.
मुख्य मार्गावरील वातानुकूलित लोकल सेवेला काही प्रमाणात प्रतिसाद वाढत आहे. परंतु हार्बरवरील वातानुकूलित लोकल गाडीला प्रतिसाद मिळत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. सीएसएमटी ते कल्याण, बदलापूर, टिटवाळा मार्गावर दिवसाला ४४ वातानुकूलित लोकल फेऱ्या होतात. या मार्गावर एप्रिल २०२२ मध्ये एकूण २२ हजार ६६६ तिकीट विक्री झाली असून प्रत्येक फेरीमागे दिवसाला सरासरी ३६२ प्रवासी प्रवास करीत आहेत. सीएसएमटी-पनवेल मार्गावर दिवसाला आठ फेऱ्या होतात. या मार्गावर एप्रिल महिन्यात ९३२ तिकीट विक्री झाली असून प्रत्येक फेरीमागे ८० आणि सीएसएमटी ते गोरेगाव मार्गावरही वातानुकूलित लोकलच्या आठ फेऱ्या होत आहेत. या महिन्यात प्रत्येक फेरीतून २०८ प्रवाशांनी प्रवास केला आहे.
हार्बरवरील वातानुकूलित लोकल गाडीला मिळणारा प्रतिसाद समाधानकारक नाही. त्या तुलनेने मध्य रेल्वे मुख्य मार्गावर वातानुकूलित लोकलला चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे हार्बरवरील वातानुकूलित लोकल सीएसएमटी ते कल्याण, बदलापूर, अंबरनाथ या मुख्य मार्गावर चालवण्याचा विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यासाठी मध्य रेल्वे महाव्यवस्थापक कार्यालयाने वातानुकूलित लोकलचे नियोजन करणाऱ्या विभागीय कार्यालयाला यासंदर्भात विचारणा केली असून त्याबाबत पडताळणी करून लवकरच निर्णय घेण्यासही सांगितले आहे.
