धोनीचा हेलिकॉप्टर शॉट, विराटची आक्रमकता, रोहित-राहणे या मुंबईकर जोडीची नजाकतभरी फलंदाजी आणि एकूणच विश्वचषकाचा माहौल दिवाणखान्यात बसून टीव्हीवर पाहण्यापेक्षा थेट कांगारूंच्या देशातच जाऊन अनुभवावा असा चंग क्रिकेटप्रेमींनी बांधला असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. विश्वचषकाच्या पाश्र्वभूमीवर ऑस्ट्रेलियावारी करण्यासाठी भारतीय पर्यटकांनी पसंती दिली असून विमान कंपन्यांनीही ही संधी साधत वाढीव तिकीटदराची ‘एक्स्ट्रा इनिंग’ खेळली आहे. एरव्ही मुंबई-अ‍ॅडलेड या प्रवासासाठी ३० ते ५० हजार रुपये मोजावे लागतात. मात्र, आता त्यासाठी ९५ हजार ते सव्वा लाख रुपये मोजावे लागत आहेत. विश्वचषकातील सगळ्यात चर्चित अशा भारत-पाकिस्तान मुकाबला याचि देही, याचि डोळा पाहण्यासाठी चाहत्यांच्या खिशाला भरुदड पडला. विशेष म्हणजे या वाढीव दरानंतरही अनेक विमान कंपन्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे.
विश्वचषकातील भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानशी होणार असल्याने पर्यटकांनी ऑस्ट्रेलिया गाठण्यासाठी गर्दी केली आहे. मात्र, मुंबई ते अ‍ॅडलेड हा प्रवास त्यांना भलताच महाग पडला आहे. दुप्पट तिकीट दरांची आकारणी त्यासाठी करण्यात येत आहे. एअर इंडियाचे इकॉनॉमी क्लासच्या तिकीटासाठी कमीतकमी ९५ हजार ते एक-सव्वा लाख रुपये मोजावे लागले आहेत. क्रिकेटप्रेमींना पुढचा आठवडाभर ऑस्ट्रेलियापर्यंतच्या प्रवासासाठी ५० ते ७५ हजार रुपये जादा मोजावे लागणार आहेत. फेब्रुवारीच्या अखेरीसच हे दर त्यांची मूळ पातळी, ३० हजार रुपये, गाठतील असा अंदाज आहे. नेहमीच्या तुलनेत भारतीय पर्यटकांचे प्रमाण ५० टक्क्य़ांनी वाढले असल्याचे निरीक्षण पर्यटन संस्थांनी
नोंदवले आहे. विश्वचषकाच्या लढतींचा आनंद लुटण्यासाठी जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांनी ऑस्ट्रेलियावारीचा निश्चय केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या व्हिसामध्ये तब्बल ५० टक्क्य़ांनी वाढ झाल्याचे ऑस्ट्रेलियाचे उपायुक्त पॅट्रिक सकलिंग यांनी सांगितले. गेल्या महिन्याभरात तब्बल १२,००० व्हिसा अर्ज दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले.
क्रिकेट सामने पहायचे आणि उरलेल्या वेळात सिडनी ऑपेरा हाऊस, फ्रेझर आर्यलड्स, ब्लू माऊंटन्स नॅशनल पार्कसारख्या पर्यटन स्थळांना भेट द्यायची, अशी आखणी करून पर्यटक ऑस्ट्रेलियात जाण्यासाठी बुकिंग करत असल्याची माहिती मेक माय ट्रीप डॉट कॉमचे प्रमुख रणजीत ओक यांनी दिली.
‘महाराजा’चे खास पॅकेज
विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियात जाणाऱ्या पर्यटकांसाठी एअर इंडियानेही खास सुविधा देऊ केल्या आहेत. क्रिकेटप्रेमींसाठी एअर इंडियाने महिनाभराचेच पॅकेज दिले आहे. त्यात विमान प्रवासात खास वाइनची व्यवस्था, तसेच ‘सचिनचा स्वीट ड्राइव्ह’, ‘रैनाचा चीजी पुल शॉट’, अशा नावाच्या खास खाद्यपदार्थाचाही आस्वाद क्रिकेटप्रेमींना घेता येईल.