मुंबई: गेल्या आठवड्यात ४८ तासांत दोन वैमानिकांचा मृत्यु झाल्याने, एअरलाइन पायलट्स असोसिएशन ऑफ इंडियाने (अल्पा इंडिया) चिंता व्यक्त केली आहे. हवाई वाहतूक नियामकाकडून विमान कंपन्यांना उड्डाण कर्तव्य वेळेच्या मर्यादेबाबत (एफडीटीएल) दिलेल्या सवलतींमुळे थेट उड्डाण सुरक्षेला धोका असून, वैमानिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवत असल्याचा आरोप केला आहे. तसेच नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) विमान कंपन्यांना वैमानिकांच्या आरोग्यासंबंधीचे अहवाल सार्वजनिक करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे.

बाली येथील मुक्कामादरम्यान २९ एप्रिलमध्ये रोजी एअर इंडियाचे कॅप्टन तरुणदीप सिंग यांना हृदयविकाराचा झटका आला. बंगळुरू येथे ३० एप्रिलला प्रशिक्षण सत्रादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने अकासा एअरचे कॅप्टन अर्जुन नायडू यांचे निधन झाले. दोन्ही वैमानिक ४५ वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. वैमानिकांच्या अकाली मृत्युमुळे अल्पा इंडियाने केंद्र सरकारला नियमांची कालमर्यादेत अंमलबजावणी करण्यावर भऱ देण्याची मागणी केली आहे. विमानचालन सुरक्षा स्वयंसेवी संस्थेच्या आकडेवारीनुसार, २००९ ते २०२३ दरम्यान उड्डाणासाठी तात्पुरते वैद्यकीयदृष्ट्या अयोग्य घोषित वैमानिकांच्या संख्येत ५२० टक्यांनी वाढ झाली आहे.

ऑगस्ट २०२३ पासून, कर्तव्यावर असताना ५० वर्षापेक्षा कमी किमान पाच भारतीय वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने वैमानिक व इतर कर्मचाऱ्यांना पुरेशी विश्रांती मिळावी याकरिता जानेवारी २०२४ मध्ये नवीन उड्डाण कर्तव्य वेळ मर्यादा नियम जाहीर केले होते. या नियमांनुसार वैमानिकांसाठी साप्ताहिक विश्रांतीचा कालावधी ३६ तासांवरून ४८ तासांपर्यंत वाढवणे, उड्डाण कर्तव्याची कमाल मर्यादा १० तासांपर्यंत निश्चित करुन रात्रीचे लँडिंग आठवड्यातून दोनदा करण्यापुरती मर्यादित करणे बंधनकारक केले होते.

नविन नियम १ जून २०२४ पर्यंत अंमलात येणे नियोजित होते. मात्र नविन नियमांमुळे विमान कंपन्यांना १० ते १२ टक्के अधिक वैमानिक नियुक्त करावे लागणार असल्याने देशांतर्गत विमान कंपन्यांनी या नियमांना विरोध केला. तसेच नविन नियमांमुळे २० टक्के उड्डाणे रद्द करण्याची वेळ येईल,असा दावा केला. विमान कंपन्यांच्या दबावामुळे केंद्र सरकारने नविन नियमांची अंमलबजावणी १३ महिन्यांसाठी पुढे ढकलत गेल्या वर्षी जुलैमध्ये टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू होईल अशी घोषणा केली. मात्र, तेव्हापासून सरकारने विमान कंपन्यांना नियम लागू करण्याबाबत वारंवार सवलती दिल्या आहेत.

आरोग्याच्या समस्या

आजारी पडणाऱ्या वैमानिकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, २००९ मध्ये उच्च रक्तदाब आणि हृदयाच्या समस्यांमुळे २५ वैमानिकांना तात्पुरते वैद्यकीयदृष्ट्या अयोग्य घोषित केले होते. २०२३ मध्ये एकूण १५५ वैमानिक अयोग्य आढळले. एफडीटीएलमधील सर्व बदल टप्प्याटप्प्याने मागे घेण्यासाठी कालमर्यादीत आराखडा तयार करावा. भारतीय विमान कंपन्यांनी नविन नियमांची एकसमान अंमलबजावणी पुन्हा सुरू करावी.विमान कंपन्यांना अनिवार्य साप्ताहिक विश्रांतीऐवजी अर्जित रजा देण्यास मनाई करणारा नियम लागू करावा.– कॅप्टन सॅम थॉमस, अध्यक्ष,अल्पा इंडिया.