मुंबई : ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग प्रकल्पातील ठाणे – बेलापूर रोड ते राष्ट्रीय महामार्ग ४ असा पहिला टप्पा व ऐरोली ते ठाणे – बेलापूर रोड या दुसऱ्या टप्प्याचे बांधकाम महिनाभरापूर्वीच पूर्ण झाले. दोन्ही टप्प्यांच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे दोन्ही टप्पे ऑक्टोबरअखेरीस वाहतूक सेवेत दाखल करण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) नियोजन होते. मात्र आता हे दोन्ही टप्पे डिसेंबरमध्ये वाहतूक सेवेत दाखल केले जाणार आहेत. या दोन्ही टप्प्यांत प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या काही उपाययोजना केल्या जात आहेत. ही कामे संपण्यासाठी दीड-दोन महिने लागणार असल्याने आता एमएमआरडीएने दोन्ही टप्प्यांच्या लोकार्पणासाठी डिसेंबरचा मुहूर्त काढला आहे.

डोंबिवली – नवी मुंबई दरम्यानच्या प्रवासाचा कालावधी ३० ते ४५ मिनिटांनी कमी करून हे अंतर १५ मिनिटांवर आणण्यासाठी एमएमआरडीएने ऐरोली – काटई नाका उन्नत मार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. सुमारे १२.७१ किमी लांबीच्या व सहापदरी ऐरोली – काटई नाका उन्नत मार्गाचे काम तीन टप्प्यांत करण्यात येत आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्याचे काम आधी सुरू करण्यात आले. ऑगस्टअखेरीस एमएमआरडीएने दोन्ही टप्प्यांचे बांधकाम १०० टक्के पूर्ण केले. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर एमएमआरडीएने मार्गाच्या सुशोभीकरणासह नामफलक, दिशादर्शक फलक लावण्याच्या कामास सुरुवात केली असून, ही कामे संपवून ऑक्टोबरअखेरीस हे दोन्ही टप्पे वाहतूक सेवेत दाखल केले जाणार होते. हे दोन्ही टप्पे सेवेत दाखल झाल्यास मुलुंड – ऐरोली पूल व मुंब्रा थेट जोडले जाऊन प्रवास अतिजलद होणार होता. पण आता मात्र या अतिजलद प्रवासासाठी प्रवाशांना डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

मुंबई – पुणे प्रवासाचे अंतर कमी करणाऱ्या मिसिंग लिंकवर काही महिन्यांपूर्वी दरड कोसळली होती. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ही दुर्घटना गंभीर होती. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आता ऐरोली – काटई नाका उन्नत मार्ग प्रकल्पातील दरड परिसरात, बोगद्यामध्ये आणि मार्गावरही सुरक्षा उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संवेदनशील परिसरात संरक्षित जाळ्या लावण्यासह अन्य कामे सध्या सुरू करण्यात आली आहेत. ही कामे पूर्ण होण्यास दीड ते दोन महिने लागणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही टप्पे आता डिसेंबरमध्ये वाहतूक सेवेत दाखल होणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, ६.७१ किमीच्या तिसऱ्या टप्प्याचे काम नुकतेच सुरू झाले आहे. हा टप्पा राष्ट्रीय महामार्ग ०४ ते काटई नाका (कल्याण – शिळ रोड महामार्ग) असा आहे. यात तीन – तीन मार्गिकांच्या मुख्य व्हायाडक्टसह एका सेवा रस्त्याचा समावेश आहे. हा टप्पा ऑक्टोबर २०२८ पर्यंत पूर्ण करून वाहतूक सेवेत दाखल करण्यात येईल. हा टप्पा सेवेत दाखल झाल्यास आणि संपूर्ण उन्नत मार्ग सेवेत दाखल झाल्यास डोंबिवली – नवी मुंबई दरम्यानचे अंतर १५ मिनिटांत पार करता येणार आहे.

पहिला, दुसरा टप्पा असा…

– ऐरोली – काटई नाका उन्नत मार्ग प्रकल्पातील पहिला टप्पा ठाणे – बेलापूर रोड ते एनएच-०४ असा असून, या टप्प्याची लांबी ३.४३ किमी आहे. – या टप्प्यात एक दुहेरी बोगदा असून, तो १.६९ किमी लांबीचा आहे. त्याची रुंदी १७.५० मीटर आहे. तर उन्नत मार्ग ०.९४ किमी लांबीचा आहे. – या पहिल्या टप्प्यामुळे महापे, शिळफाटा व कल्याण फाटा येथील वाहतूक कोंडी टाळून राष्ट्रीय महामार्ग ०४ ला अखंड जोड मिळणार आहे. – ऐरोली ते ठाणे – बेलापूर रोडदरम्यानचा २.५७ किमी लांबीचा दुसरा टप्पा असून, यात तीन मार्गिकांच्या मुख्य व्हायाडक्टचा समावेश आहे.