मुंबई : नवी मुंबई – डोंबिवली प्रवास केवळ १५ मिनिटांत करता यावा यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग बांधत आहे. या प्रकल्पाचे काम तीन टप्प्यांत सुरू असून यातील दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. पहिला टप्प्यातील काम अंतिम टप्प्यात आहे. पहिल्या टप्प्यातील उर्वरित काम पूर्ण करून पहिला आणि दुसरा टप्पा एकत्रित सप्टेंबरपर्यंत वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. तर तिसऱ्या टप्प्याच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली असून हा टप्पा पूर्ण होण्यासाठी ऑक्टोबर २०२८ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. तिन्ही टप्पे सेवेत दाखल होऊन पूर्ण उन्नत रस्ता सेवेत दाखल झाल्यास नवी मुंबई – डोंबिवलीदरम्यानच्या शिळफाटा येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. तर नवी मुंबई – डोंबिवली प्रवास अतिजलद होणार आहे.
१२.७१ किमीचा मार्ग
नवी मुंबई – डोंबिवली प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी एमएमआरडीएने सुमारे १२.७१ किमी लांबीचा ऐरोली – काटई नाका उन्नत मार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळे ऐरोली – डोंबिवलीदरम्यानचे प्रवासाचे अंतर अंदाजे १० किमीने कमी होणार आहे. प्रवासाचा ३० ते ४५ मिनिटांचा कालावधी कमी होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. तीन-तीन मार्गिकांच्या या प्रकल्पाचे काम तीन टप्प्यांत सुरू आहे.
पहिला टप्पा ठाणे – बेलापूर रोड ते एनएच-०४ असा असून या टप्प्याची लांबी ३.४३ किमी आहे. या टप्प्यात एक दुहेरी बोगदा असून तो १.६९ किमी लांबीचा आहे. तर त्याची रुंदी १७.५० मीटर आहे. तर उन्नत मार्ग ०.९४ किमी लांबीचा आहे. या पहिल्या टप्प्यामुळे महापे, शिळफाटा आणि कल्याण फाटा येथील वाहतूक कोंडी टाळून राष्ट्रीय महामार्ग ०४ ला अखंड जोड मिळणार आहे. या टप्प्याचे ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. तर ऐरोली ते ठाणे-बेलापूर रोड दरम्यानचा २.५७ किमी लांबीचा दुसरा टप्पा असून यात तीन-मार्गिकांच्या मुख्य व्हायाडक्टचा समावेश आहे. या टप्प्याचे १०० टक्के काम पूर्ण झाले आहे.
वाहतूक कोंडी दूर होणार
पहिल्या टप्प्याचे उर्वरित काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करून पहिला आणि दुसरा टप्पा सप्टेंबर २०२६ पर्यंत वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन असल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली. पहिला आणि दुसरा टप्पा सेवेत दाखल झाल्यास मुलुंड-ऐरोली पूल आणि मुंब्रा थेट जोडले जाणार आहे. त्याचवेळी ६.७१ किमीच्या तिसऱ्या टप्प्याचे काम नुकतेच सुरू झाले आहे. हा टप्पा राष्ट्रीय महामार्ग ०४ ते काटई नाका (कल्याण-शिळ रोड महामार्ग) असा आहे. यात तीन-तीन मार्गिकांच्या मुख्य व्हायाडक्टसह एका सेवा रस्त्याचा समावेश आहे. हा टप्पा ऑक्टोबर २०२८ पर्यंत पूर्ण करून वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. हा टप्पा पर्यायाने संपूर्ण १३.७१ किमीचा महामार्ग सेवेत दाखल झाल्यास नवी मुंबई – डोंबिवली अंतर केवळ १५ मिनिटांत पार करता येणार असून वाहतूक कोंडी दूर होणार आहे.
ऐरोलीतील अंतर्गत रस्त्यांवरील, ठाणे-बेलापूर रोडवरील, महापे रोडवरील, शिळफाटा जंक्शन, कल्याण फाटा आणि कल्याण-शिळ रोड येथील वाहतूक कोंडी दूर होईल, असा दावा एमएमआरडीएकडून केला जात आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार असून हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
