मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ऐरोली ते काटई नाका उन्नत मार्ग प्रकल्पातील ठाणे-बेलापूर रोड ते एनएच-०४ अशा टप्पा १ व ऐरोली ते ठाणे-बेलापूर रोड अशा टप्पा २ चे अखेर १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. आता रंगरंगोटीसह सजावटीची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर भारवहन क्षमता चाचणी घेऊन हे दोन्ही टप्पे महिन्याभरात सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. मात्र, नवी मुंबई ते डोंबिवली प्रवास अवघ्या १५ मिनिटांत करण्यासाठी वाहनचालक-प्रवाशांना ऑक्टोबर २०२८ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. कारण या प्रकल्पातील राष्ट्रीय महामार्ग ०४ ते काटई नाका (कल्याण-शिळ रोड महामार्ग) या तिसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण होण्यासाठी ऑक्टोबर २०२८ उजाडणार आहे.

महामुंबईतील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी एमएमआरडीएकडून विविध रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यातील एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे ऐरोली ते काटई नाका उन्नत मार्ग प्रकल्प. नवी मुंबई-डोंबिवली प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी एमएमआरडीएने सुमारे १२.७१ किमी लांबीचा ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग प्रकल्प हाती घेतला आहे.

या प्रकल्पामुळे ऐरोली-डोंबिवलीदरम्यानचे प्रवासाचे अंतर अंदाजे १० किमीने कमी होणार आहे. प्रवासाचा ३० ते ४५ मिनिटांचा कालावधी कमी होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. तीन-तीन मार्गिकांच्या या प्रकल्पाचे काम तीन टप्प्यांत हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार टप्पा १ आणि २ चे काम मागील काही वर्षांपासून सुरू होते. तर तिसऱ्या टप्प्याचे काम नुकतेच सुरू झाले आहे. दरम्यान, पहिला आणि दुसरा टप्पा याआधीच पूर्ण होऊन वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, विविध कारणांनी या कामास विलंब झाला आहे. पण आता मात्र या दोन्ही टप्प्यांचे १०० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकसत्ताला दिली.

ऐरोली ते काटई नाका उन्नत मार्ग प्रकल्पातील पहिला टप्पा ठाणे-बेलापूर रोड ते एनएच-०४ असा असून, या टप्प्याची लांबी ३.४३ किमी आहे. या टप्प्यात एक दुहेरी बोगदा असून, तो १.६९ किमी लांबीचा आहे. तर त्याची रुंदी १७.५० मीटर आहे. तर उन्नत मार्ग ०.९४ किमी लांबीचा आहे. या पहिल्या टप्प्यामुळे महापे, शिळफाटा व कल्याण फाटा येथील वाहतूक कोंडी टाळून राष्ट्रीय महामार्ग ०४ ला अखंड जोड मिळणार आहे. तर ऐरोली ते ठाणे-बेलापूर रोडदरम्यानचा २.५७ किमी लांबीचा दुसरा टप्पा असून, यात तीन मार्गिकांच्या मुख्य व्हायाडक्टचा समावेश आहे. या दोन्ही टप्प्यांचे आता १०० टक्के काम पूर्ण झाले असून, आता रंगरंगोटीसह सजावटीची कामे सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. तर ही कामे पूर्ण झाल्यानंतर या दोन्ही टप्प्यांवर भारवहन क्षमता चाचणी घेण्यात येईल व त्यानंतर हे दोन्ही टप्पे वाहतूक सेवेत दाखल केले जातील.

यासाठी किमान महिन्याभराचा कालावधी अपेक्षित असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सप्टेंबरअखेरीस वा ऑक्टोबरच्या सुरुवातीला हे दोन टप्पे सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.

थेट मुंब्य्राशी जोडणी

पहिला आणि दुसरा टप्पा सेवेत दाखल झाल्यास मुलुंड-ऐरोली पूल आणि मुंब्रा थेट जोडले जाणार आहेत. त्याचवेळी ६.७१ किमीच्या तिसऱ्या टप्प्याचे काम नुकतेच सुरू झाले आहे. हा टप्पा राष्ट्रीय महामार्ग ०४ ते काटई नाका (कल्याण-शिळ रोड महामार्ग) असा आहे. यात तीन-तीन मार्गिकांच्या मुख्य व्हायाडक्टसह एका सेवा रस्त्याचा समावेश आहे. हा टप्पा ऑक्टोबर २०२८ पर्यंत पूर्ण करून वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण १३.७१ किमीचा महामार्ग सेवेत दाखल झाल्यास नवी मुंबई-डोंबिवली अंतर केवळ १५ मिनिटांत पार करता येणार असून, वाहतूक कोंडी दूर होणार आहे. ऐरोलीतील अंतर्गत रस्त्यांवरील, ठाणे-बेलापूर रोडवरील, महापे रोडवरील, शिळफाटा जंक्शन, कल्याण फाटा आणि कल्याण-शिळ रोड येथील वाहतूक कोंडी दूर होईल, असा दावा एमएमआरडीएकडून केला जात आहे.