मुंबई : नवी मुंबई – डोंबिवली प्रवास केवळ १५ मिनिटांत करता यावा यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग बांधत आहे. या प्रकल्पाचे काम तीन टप्प्यांत सुरू असून, यातील दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्याचे ९२ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम येत्या काही दिवसांत पूर्ण करून हे दोन्ही टप्पे जुलैअखेरपर्यंत वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) आहे. मात्र डोंबिवली ते नवी मुंबई असा थेट प्रवास १५ मिनिटांत करण्यासाठी वाहनचालक-प्रवाशांना ऑक्टोबर २०२८ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. कारण या प्रकल्पातील तिसऱ्या टप्प्याचे काम नुकतेच सुरू झाले असून, हा टप्पा ऑक्टोबर २०२८ मध्ये पूर्ण होणार आहे.
ऐरोली ते काटई उन्नत मार्ग प्रकल्प. सुमारे १२.७१ किमी लांबीचा ऐरोली – काटई नाका उन्नत मार्ग प्रकल्प असून, या प्रकल्पामुळे ऐरोली – डोंबिवलीदरम्यानचे प्रवासाचे अंतर अंदाजे १० किमीने कमी होणार आहे. प्रवासाचा ३० ते ४५ मिनिटांचा कालावधी कमी होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. अशा या प्रकल्पाचे काम तीन टप्प्यांत हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पातील दोन टप्प्यांचे काम सध्या सुरू आहे. तर तिसऱ्या टप्प्याचे काम नुकतेच सुरू झाले आहे. दरम्यान, पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा २०२४ मध्ये पूर्ण अपेक्षित होते. मात्र संथ गतीमुळे आणि इतर कारणांमुळे या दोन्ही टप्प्यांच्या पूर्णत्वास विलंब झाला आहे. आता मात्र या प्रकल्पातील दोन टप्पे वाहतूक सेवेत दाखल होणार आहेत. ठाणे-बेलापूर रोड ते एनएच-०४ अशा ३.४३ किमीच्या पहिल्या टप्प्याचे काम ९२ टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. आता किरकोळ कामे राहिली असून, ही कामे येत्या काही दिवसांत पूर्ण होतील, अशी माहिती एमएमआरडीएतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली.
पहिला टप्पा अंतिम टप्प्यात असतानाच ऐरोली ते ठाणे-बेलापूर रोड दरम्यानच्या २.५७ किमी लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे काम याआधीच पूर्ण झाले आहे. पहिला आणि दुसरा टप्पा एकत्रित सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करून जुलैच्या दुसऱ्या वा तिसऱ्या आठवड्यात हे दोन्ही टप्पे वाहतूक सेवेत दाखल केले जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास महापे, शिळफाटा आणि कल्याण फाटा येथील वाहतूक कोंडी टाळून राष्ट्रीय महामार्ग-४ ला अखंड जोड मिळणार आहे. दोन्ही टप्पे सेवेत दाखल झाल्यास मुलुंड-ऐरोली पूल आणि मुंब्रा थेट जोडले जाणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी दूर होऊन प्रवास अतिजलद होणार आहे. दरम्यान, ६.७१ किमीच्या तिसऱ्या टप्प्याचे काम नुकतेच सुरू झाले आहे. हा टप्पा राष्ट्रीय महामार्ग ०४ ते काटई नाका (कल्याण-शिळ रोड महामार्ग) असा आहे. यात तीन मार्गिकांच्या मुख्य व्हायाडक्टसह एका सेवा रस्त्याचा समावेश आहे. हा टप्पा ऑक्टोबर २०२८ पर्यंत पूर्ण करून वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. हा टप्पा म्हणजेच संपूर्ण १२.७१ किमीचा महामार्ग सेवेत दाखल झाल्यास नवी मुंबई – डोंबिवली अंतर केवळ १५ मिनिटांत पार करता येणार असून वाहतूक कोंडी दूर होणार आहे.
