मुंबई : गेल्या काही वर्षांत विमानतळांच्या वापरकर्ता विकास शुल्कात सरासरी ३०० टक्क्यांनी वाढ झाल्याने हवाई प्रवाशांना आर्थिक झळ बसत आहे. २०२२ ते २०२६ दरम्यान वापरकर्ता विकास शुल्कातील वाढीमुळे भारतातील प्रमुख विमानतळांवरील विमान प्रवास महागला आहे. देशातील १० प्रमुख विमानतळांवर आंतरराष्ट्रीय वापरकर्ता विकास शुल्कात जवळपास ३८७ टक्के आणि देशांतर्गत वापरकर्ता विकास शुल्कामध्ये सुमारे २०० टक्यांनी वाढ झाली आहे. अहमदाबादमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवली गेली असून मुंबईच्या आंतरराष्ट्रीय प्रवासी शुल्कात २५९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
गेल्या चार वर्षांत देशभरातील प्रमुख विमानतळांवर बाहेर जाणार्या प्रवाशांकडून आकारले जाणारे वापरकर्ता विकास शुल्क महागले आहे. यामुळे भारतातील प्रमुख विमानतळांवरील विमान तिकिटात वाढ झाली आहे. अहमदाबाद विमानतळावरील आंतरराष्ट्रीय वापरकर्ता विकास शुल्कामध्ये सर्वाधिक १,३०० टक्क्यांची वाढ आहे. भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाद्वारे निर्धारित केलेले वापरकर्ता विकास शुल्क, विमानतळ सवलतदारांकडून भांडवली खर्च आणि परिचालन खर्चासाठी निधी उभारण्याकरिता थेट प्रवाशांकडून गोळा केले जाते.
विमानतळांच्या महसुली कामकाजाकरिता मार्च २०२२ ते मार्च २०२६ या कालावधीत दहा प्रमुख विमानतळांवरील दर रचनेत मोठे बदल झाल्याचे दिसून येते. मुंबई आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी वापरकर्ता विकास शुल्कात २५९ टक्क्यांनी वाढ झाली. इकॉनॉमी क्लाससाठी १७१ रुपयांवरून ६१५ रुपये आणि बिझनेस क्लाससाठी ६९५ रुपये मोजावे लागतात. अहमदाबाद आणि चेन्नई येथे टक्केवारीत सर्वाधिक वाढ आहे.
कोलकात्यात घट
कोलकाताचे नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ हे एकमेव प्रमुख केंद्र आहे. जिथे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय शुल्कात ६ टक्क्यांची घट झाली आहे.
वापरकर्ता विकास शुल्क म्हणजे काय?
विमानतळ विकास शुल्क म्हणजेच वापरकर्ता विकास शुल्क हे विमानतळ ऑपरेटरद्वारे प्रवाशांना दिल्या जाणार्या सुविधांच्या बदल्यात विमान तिकीटात समाविष्ट करून घेतले जाणारे अतिरिक्त शुल्क आहे. हे शुल्क विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाद्वारे ठरवले जाते.
