अभिनेता संजय दत्तच्या वांद्रे येथील निवासस्थानी बुधवारी रात्रीपासून त्याचे निकटवर्ती आणि सहकलाकार यांची वर्दळ सुरू होती. तुरुंगात शरण येण्याची तारीख जाहीर झाल्यानंतर संजयला भेटण्यासाठी त्याच्या सहकलाकारांची गर्दी केली होती. चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट आणि संजयबरोबर एकत्र काम केलेला अभिनेता अजय देवगण यांच्याबरोबर संजयची प्रदीर्घ चर्चा झाली. सध्या संजयच्या नव्याने सुरू करण्यात आलेल्या होम प्रॉडक्शन बॅनरखाली काही चित्रपटांची निर्मिती करण्यात येत असून बॅनर अगदीच नवीन असल्याने त्याच्या कामकाजावर देखरेख करण्याची विनंती त्याने अजयला केल्याचे सूत्रांकडून समजते.
संजय दत्तच्या होम प्रॉडक्शनची जबाबदारी अर्थात पत्नी मान्यता सांभाळणार आहे. या बॅनरखाली ‘हसमुख फिसल गया’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. याशिवाय, दिग्दर्शक संजय गुप्ताबरोबरही काही चित्रपटांच्या सहनिर्मितीची जबाबदारी संजयने घेतली होती. ‘हसमुख फिसल गया’मध्ये संजय एक छोटी भूमिका करण्यासही उत्सुक होता आणि त्याने ती इच्छा पूर्ण केली. संजयच्या अपूर्ण राहिलेल्या चित्रपटांची यादी इतकी मोठी होती की गेल्या महिन्याभरात त्यातल्या केवळ तीन चित्रपटांचे चित्रिकरण पूर्ण करण्यात त्याला यश मिळाले आहे. यात राहुल अगरवाल निर्मित ‘पोलिसगिरी’, करण जोहरचा ‘उंगली’ हे चित्रपट पूर्ण झाले आहेत तर दुसरीकडे राजकुमार हिरानीचा ‘पीके’ आणि ‘जंजीर’ या दोन मोठय़ा चित्रपटांचे चित्रिकरण अर्धवट असल्याची माहिती संजयच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. या सर्वाना आता संजयचा उरलेला भाग वगळून काम करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.