‘शतक – संघ के १०० वर्ष’ या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला बॉलीवूड सुपरस्टार अजय देवगण यांच्या प्रभावी आवाजाची साथ लाभली आहे. त्यांच्या भारदस्त आवाजामुळे चित्रपटाची पहिलीच झलक अतिशय प्रभावी ठरते आहे. यावरून चित्रपटाची भव्यता, भावना आणि गंभीरता यांचा अंदाज येतो.
त्याग, चिकाटी आणि राष्ट्रप्रथम या मूल्यांवर आधारलेला हा चित्रपट गुरुजी माधव सदाशिवराव गोळवलकर यांच्या संघाच्या चिरंतन विचारांवर आधारित शतकीय प्रवासाचा मागोवा घेतो. विविध दस्तऐवजीकरणावर आधारलेला हा चित्रपट इतिहासातील काही न सांगितलेल्या अध्यायांकडे एका दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करतो. भगव्या रंगाच्या प्रभावी प्रतीकातून ही संकल्पना अधिक ठळकपणे मांडण्यात आली आहे.
चित्रपटाचा भाग असल्याबद्दल अजय देवगण म्हणाले, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. एक शतक हे केवळ कालगणनेतील टप्पा नसून, ते पिढ्यान् पिढ्यांच्या बांधिलकी, त्याग आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचे प्रतीक आहे. या शंभर वर्षांत संघाने सेवा, एकात्मता आणि सांस्कृतिक ओळख यांविषयीच्या चर्चांना आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ‘शतक’ या दीर्घ प्रवासावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. माझ्यासाठी या कथेला आवाज देणे हा खरोखरच सन्मान आहे. ही केवळ एका संस्थेची गोष्ट नाही, तर एका विचाराची कथा आहे, जी काळाच्या ओघात अनेक आव्हानांना सामोरे जात ठामपणे उभी राहिली. जिद्द, श्रद्धा आणि सामूहिक ध्येय यांविषयी बोलणाऱ्या या कथेला माझा आवाज देणे ही अत्यंत अर्थपूर्ण अनुभूती आहे.’
पॅनोरमा यांच्या सहयोगाने निर्मित या चित्रपटाची निर्मिती वीर कपूर यांनी केली असून, दिग्दर्शन आशीष मल्ल यांचे आहे. सह-निर्माते आशीष तिवारी आहेत. ‘शतक’ २० फेब्रुवारी २०२६ रोजी देशभर प्रदर्शित होणार आहे.

