मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागात पर्यवेक्षक पदावर कार्यरत असलेल्या अजय लालवानी या अंध गिर्यारोहकाने जिद्द, कठोर मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर नुकताच माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केला. अजय यांनी १८ एप्रिल ते १ मे दरम्यान अवघ्या १० दिवसांमध्ये तब्बल ५३६४ मीटर उंचीवरील एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केला. या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या जल अभियंता विभागात अजय काम करतात. अजय लालवानी यांना गिर्यारोहणाबरोबरच सायकलिंगचीही प्रचंड आवड असून त्यांनी सायकलवरून मुंबई – काश्मीर – कन्याकुमारी – मुंबई असा सुमारे ७५०० किलोमीटर प्रवास ४५ दिवसांमध्ये पूर्ण केला आहे. काश्मीर ते कन्याकुमारी हा ३,८०० किलोमीटरचा प्रवास त्यांनी नऊ दिवस १२ तास आणि ४ मिनिटांत पूर्ण करून उल्लेखनीय विक्रम केला. त्यामुळे ते जागतिक विक्रमाचा मानकरी ठरले. गिर्यारोहण, सायकलिंगबरोबरच त्यांना ज्युडो, ट्रायथलॉन, मल्लखांब या क्रीडा प्रकारांचीही आवड आहे.

अजय आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्युडो खेळाडू असून त्यांनी ट्रायथलॉन स्पर्धाही पूर्ण केली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधील मल्लखांबच्या प्रात्यक्षिकात त्यांनी देशाचे प्रतिनिधीत्वही केले होते. त्याचबरोबर महाराष्ट्रातील २८५ हून अधिक गड-किल्ल्यांच्या मोहिमाही त्याने पूर्ण केल्या. हिमालयातील चार ठिकाणी त्याने गिर्यारोहणही केले. केवळ गिर्यारोहण, क्रीडा प्रकाराचीच नव्हे तर त्यांना शिक्षणाचीही आवड आहे. त्यातूनच ते कीर्ती महाविद्यालयात पदवी शिक्षणाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहेत. अंध असूनही त्याने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अशक्य वाटणारी अनेक स्वप्ने पूर्ण केली. आता एव्हरेस्ट सर करण्याचे त्याचे स्वप्न आहे.

स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदतीची गरज “जगातील सर्वोच्च शिखर असलेले माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचे आपले स्वप्न आहे. मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने मदतीचा हात द्यावा,” अशी विनंती अजय यांनी केली आहे. राज्य सरकार आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून माउंट एव्हरेस्ट मोहिमेसाठी आर्थिक मदत मिळाली, तर आणखी एक मोठी कामगिरी करता येईल, असा आशावाद अजय यांनी व्यक्त केला.