मुंबई : जसप्रीत बुमरा आमच्यासाठी खेळाडू म्हणून जास्त महत्त्वाचा आहे. त्यामुळे आम्ही त्याच्या कार्यभार व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष देणार आहोत. फिजिओ आणि डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंडमध्ये सर्व सामने खेळणे बुमराला शक्य होणार नाही. त्यामुळे आम्ही धोका पत्करण्याऐवजी दीर्घकालीन विचार करून कसोटी कर्णधारपदासाठी शुभमन गिलला पसंती दिली, असे वक्तव्य राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी केले.
भारतीय क्रिकेट संघाचा ३७ वा कसोटी कर्णधार म्हणून अपेक्षेनुसार शुभमन गिलची निवड करण्यात आली. आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची शनिवारी घोषणा करण्यात आली. अष्टपैलू शार्दूल ठाकूर आणि करुण नायर यांचे कसोटी संघात पुनरागमन झाले असून डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि फलंदाज साई सुदर्शन यांना प्रथमच कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या तंदुरुस्तीबाबत शाश्वती नसल्याने त्याची कसोटी संघात निवड करण्यात आली नाही. तसेच फलंदाज सर्फराज खान आणि वेगवान गोलंदाज हर्षित राणा यांना वगळण्यात आले आहे.
विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विन या अनुभवी त्रिकुटाने अलीकडेच कसोटी क्रिकेटला अलविदा केल्याने भारतीय कसोटी संघाला आता संक्रमणातून जावे लागणार आहे. इंग्लंड दौरा भारतीय संघासाठी वेगळे आव्हान उपस्थित करणारा ठरेल, असे आगरकर यांनी नमूद केले.
रोहितच्या निवृत्तीनंतर कसोटी कर्णधारपदासाठी विविध नावे चर्चेत होती. यात प्रामुख्याने बुमरा, गिल आणि केएल राहुल यांचा समावेश होता. भारतीय संघाने याआधी खेळलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत वेगवान गोलंदाज बुमराने उपकर्णधारपद भूषवले होते. इतकेच नाही तर, त्याने या मालिकेतील दोन सामन्यांत नेतृत्वाची धुराही सांभाळली होती. मात्र, याच मालिकेतील सिडनी येथे झालेल्या अखेरच्या कसोटीत बुमराला पाठीच्या दुखापतीने त्रस्त केले. पुढील तीन महिने त्याला स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर राहावे लागले. त्यामुळे आता गोलंदाज म्हणून त्याच्या अलौकिक गुणवत्तेला प्राधान्य देताना कर्णधारपदी गिलला नियुक्त करणे निवड समितीने पसंत केले आहे.
कर्णधारपदासाठी तिसरा दावेदार राहुलबाबत आम्ही चर्चाही केली नसल्याचे आगरकर यांनी स्पष्ट केले. उपकर्णधारपदी यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतची निवड करण्यात आली.
शार्दूल, करुणचे पुनरागमन
मुंबईकर अष्टपैलू शार्दूलचे दीड वर्षांनी, तर विदर्भाचा फलंदाज करुणचे सात वर्षांनी कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. हे दोघे कसोटी मालिकेआधी इंग्लंड लायन्सविरुद्ध भारत ‘अ’ संघाकडूनही खेळतील. रणजी करंडक स्पर्धेच्या गेल्या हंगामात या दोघांनी चमकदार कामगिरी केली होती. शार्दूलने ९ सामन्यांत एक शतक आणि चार अर्धशतकांच्या मदतीने ५०५ धावा केल्या आणि ३५ गडी बाद केले. करुणने ९ सामन्यांत चार शतके आणि दोन अर्धशतकांच्या साहाय्याने ८६३ धावा केल्या. करुणला कौंटी क्रिकेटचाही अनुभव असून त्याने सहा कसोटी सामनेही खेळले आहेत.
निवड समिती अध्यक्ष म्हणतात…
● बुमराबाबत : बुमरा इंग्लंड दौऱ्यातील सर्व सामन्यांसाठी उपलब्ध नसेल. तो तीन की चार सामने खेळणार हे संघ व्यवस्थापन ठरवेल. आमच्यासाठी तो खेळाडू म्हणून जास्त महत्त्वाचा आहे. कर्णधार असताना तुम्हाला अन्य १५-१६ जणांचाही विचार करावा लागतो. हा अतिरिक्त भार त्याच्यावर टाकणे योग्य नाही असे आम्हाला वाटले. त्याने पूर्णपणे तंदुरुस्त असावे अशी आमची इच्छा आहे.
● शमीबाबत : इंग्लंड दौऱ्यापूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी शमी प्रयत्न करत होता. मात्र, गेल्या आठवड्यात त्याच्या प्रयत्नांना धक्का बसला. त्याच्या काही चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर तो पाच कसोटी सामने खेळू शकणार नाही असे आम्हाला वैद्याकीत पथकाकडून सांगण्यात आले. तो काही सामने खेळेल अशी आम्हाला आशा होती, पण ते शक्य नाही.
● सर्फराजबाबत : सर्फराजने भारतात (न्यूझीलंडविरुद्ध) पहिल्या कसोटीत शतक केले, पण त्यानंतर त्याच्या फारशा धावा झाल्या नाहीत. संघ व्यवस्थापनाला काही निर्णय घ्यावेच लागतात. संघनिवड करताना तुम्ही सर्वांना संधी देणे शक्य नसते. सध्याच्या घडीला सर्फराजपेक्षा करुण अधिक चांगला पर्याय असल्याचे आम्हाला वाटले. करुणने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा केल्या असून त्याला कौंटीचाही अनुभव आहे.
● शार्दूलबाबत : इंग्लंडमध्ये वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू महत्त्वाचा ठरू शकतो. नितीश रेड्डी संघात असला, तरी तो प्रामुख्याने फलंदाज आहे. त्याच्यात गोलंदाजी करण्याची क्षमता आहे, पण परिस्थिती साजेशी असेल तरच तो उपयुक्त ठरू शकतो. मात्र, शार्दूल हा मुख्यत: वेगवान गोलंदाज आहे आणि फलंदाजीतही योगदान देऊ शकतो.
अनुभवाची कमतरता
गेल्या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाने कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली होती. त्यावेळचा संघ अनुभवसंपन्न होता. यंदा मात्र चित्र वेगळे आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झालेल्या एकाही खेळाडूला १०० कसोटी सामन्यांचा अनुभव नाही. सध्याच्या संघात सर्वाधिक कसोटी सामने रवींद्र जडेजाने (८०) खेळले आहेत. विराट कोहली (१२३ कसोटी), रविचंद्रन अश्विन (१०६) आणि रोहित शर्मा (६७) यांची निवृत्ती, तर चेतेश्वर पुजारा (१०३), अजिंक्य रहाणे (८५) आणि मोहम्मद शमी (६४) संघाबाहेर असल्याने भारताला युवकांवर अवलंबून राहावे लागेल.
२५ गिलची वयाच्या २५व्या वर्षी कसोटी कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय कसोटी इतिहासातील तो पाचवा सर्वांत युवा कर्णधार ठरला आहे. याआधी मन्सूर अली खान पतौडी (२१), सचिन तेंडुलकर (२३), कपिल देव (२४) आणि रवी शास्त्री (२५) यांनी गिलपेक्षा कमी वयात कसोटी संघाचे नेतृत्व केले होते.
कसोटी संघ
● फलंदाज : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर
● यष्टिरक्षक : ऋषभ पंत (उपकर्णधार), ध्रुव जुरेल
● अष्टपैलू : रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, शार्दूल ठाकूर
● गोलंदाज : जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव