मुंबई : उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी आमदार निधी वितरित करण्याच्या फाईलवर शेवटची स्वाक्षरी केली होती. यातून ३२१ आमदारांना निधीसाठी १३५४ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले.

आमदार निधीच्या फाईलवर शेवटची स्वाक्षरी करतानाच त्यांनी सदारनिधीसाठी असलेल्या ई – साक्षी प्रणालीच्या धर्तीवर ई समर्थ प्रणालीची संकल्पना मांडून ती पूर्णत्वास आणली. याची सुरुवात पुढील महिन्यात पुणे येथून होणार असून या प्रणालीमुळे आमदार विकास निधीच्या कामांची देयके थेट कंत्राटदारांच्या खात्यात जमा केली जाणार आहेत.

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत २०२५-२६ आर्थिक वर्षाकरिता २२०० कोटींची तरतूद करण्यात आली होती. या निधीपैकी ६६० कोटींचा निधी बिम्स प्रणालीच्या माध्यमातून आधीच वितरित करण्यात आला. त्यापैकी रु.२५०.६२ कोटी इतका निधी संदर्भाधीन क्र. ३ येथील शासन निर्णयान्वये सर्व जिल्ह्यांना वितरित करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत वित्त विभागाकडून रु.९४४.६२ कोटी इतका निधी वितरणासाठी उपलब्ध करुन दिलेला आहे.

त्यानुसार वीम्स प्रणालीवर यापूर्वीचा शिल्लक रु.४०९.३८ कोटी व वित्त विभागाकडून प्राप्त रु.९४४.६२ कोटी असा एकूण रु.१३५४.०० कोटी इतका निधी वितरणासाठी उपलब्ध करण्यात आला आहे. आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत २६७ विधानसभा सदस्य आणि ५४ विधान परिषद सदस्यांना या निधीचे वितरण करण्यात आले आहे. त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे.

पुण्यातून ईसमर्थ प्रणालीची सुरुवात

खासदार विकास निधीचे वितरण पूर्णत: ऑनलाइन पद्धतीने ई साक्षी प्रणालीद्वारे करण्यात येते. त्याच धर्तीवर आमदारांसाठीही ई समर्थ प्रणाली असावी याची संकल्पना अजित पवार यांनी मांडली. त्यानुसार त्याची संपूर्ण तयारीही त्यांनी केली. पुढील महिन्यात या प्रणालीचे उद्घाटन पुण्यात करण्यात येणार होते.. या प्रणालीद्वारेच पुण्यातील २४ आमदारांना विकास निधीचे वितरण हे ई समर्थ प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे. यामध्ये विधानसभेच्या २१ तर विधान परिषदेच्या तीन आमदारांचा समावेश आहे. पुण्यातून सुरुवात झाल्यानंतर ही प्रणाली संपूर्ण राज्यभरात लागू करण्यात येणार असून यापुढे सर्व आमदारांचा विकास निधी हा ई प्रणालीद्वारे होणार आहे. यासाठी आमदारांना ई लॉगिन आयडी देण्यात येणार असून त्यावर लॉगिन करून आपल्या विभागातील कामांची शिफारस करता येणार आहे. त्याचप्रमाणे कंत्राटदारांनाही झालेल्या कामांचा निधीही याच प्रणालीमार्फत त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.