मुंबई : खातेवाटपानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित नव्हते. दुसरीकडे, काही मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नसल्याने तात्काळ पदभार स्वीकारावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना केली. काही मंत्र्यांनी दालनात प्रवेश करताना पूजाअर्चा गुरुवारी आयोजित केली होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या परदेशात असून, ते शनिवारी भारतात परतणार आहेत. यामुळे अजितदादा खातेवाटपानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीला अनुपस्थित होते. दत्ता भरणे वगळता राष्ट्रवादीचे अन्य मंत्री बैठकीला उपस्थित होते.

हेही वाचा : मंत्रालयात सर्वसामान्यांच्या प्रवेशावर कठोर निर्बंध

खातेवाटप होऊन दहा दिवस झाले तरी काही मंत्र्यांनी अद्यापही पदभार स्वीकारलेला नाही. अशा मंत्र्यांनी तात्काळ पदभार स्वीकारावा अशी सूचना फडणवीस यांनी मंत्र्यांना केली. काही मंत्र्यांच्या दालनाची डागडुजी युद्धपातळीवर चालू आहेत. दालने तयार नसल्याने काही मंत्र्यांनी पदभार स्वीकारण्याचे टाळले आहे. गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी अतुल सावे, गुलाबराव पाटील, आशिष जैस्वाल आणि माधुरी मिसाळ या मंत्र्यांनी पदभार घेतला. यावेळी काही मंत्र्यांच्या दालनात पूजाअर्चा आयोजित करण्यात आली होती. दत्ता भरणे व योगेश कदम या दोघांनी अद्यापही पदभार स्वीकारलेला नसल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांकडून ई-कॅबिनेटचे सूतोवाच

भरणे पुढील आठवड्यात पदभार स्वीकारणार

‘मी नाराज नाही. मला मिळालेले क्रीडा, युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास खाते बदलून देण्याची मागणी पक्ष नेतृत्वाकडे केलेली नाही. पुढील आठवड्यात मंत्रीपदाचा पदभार स्वीकारणार आहे, असे दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले. भरणे नाराज असल्याने त्यांनी पदभार स्वीकारला नसल्याची चर्चा होती. पण भरणे यांनी त्याचा इन्कार केला. मी परदेशात गेल्याने पदभार स्वीकारला नव्हता, असेही त्यांनी सांगितले. इंदापूरमध्ये गुरुवारी माझ्या कार्यकर्त्याच्या घरी लग्न होते. त्यामुळे मी लग्नाला उपस्थित राहिलो. शिवाय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत माझ्या खात्याच्या संबंधित विषय नव्हता. त्यामुळे मी बैठकीला उपस्थित नव्हतो, असे भरणे म्हणाले.

Story img Loader