मुंबई : काँग्रेसचे बॅ. शेषराव वानखेडे यांनी राज्याचा सर्वाधिक १३ वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यांच्यानंतर अजित पवार हे दुसरे सर्वाधिक म्हणजेच ११ वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री होते. विद्यमान महायुती सरकारच्या २०२९ पर्यंतच्या कार्यकाळात अजित पवार यांच्या नावे राज्यात सर्वाधिक १५ वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम होणार होता.
अजित पवार हे राज्याचे सर्वाधिक सहावेळा उपमुख्यमंत्री राहिले. तसेच पाच वर्षाच्या काळात तीनवेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे ते एकमेव होते. काँग्रेसचे बॅ. शेषराव वानखेडे १३ वेळा, राष्ट्रवादीचे सांगलीचे जयंत पाटील यांनी १० वेळा आणि काँग्रेसचे सोलापूरचे सुशीलकुमार शिंदे ९ वेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे.
अजित पवार यांनी सादर केलेला २०२५-२६ चा अर्थसंकल्प ७ लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचा होता. वर्ष २०११-१२, वर्ष २०१२-१३, वर्ष २०१४-१५ मध्ये दोन अर्थसंकल्प, वर्ष २०२०-२१, वर्ष २०२१-२२, वर्ष २०२२-२३, वर्ष २०२४-२५ मध्ये दोन अर्थसंकल्प आणि वर्ष २०२५-२६ असे ११ वेळा अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला.
२३ फेब्रुवारी पासून मुंबईत प्रारंभ होणऱ्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करण्याची अजित पवार यांच्या विभागाची तयारी चालू होती. त्यासंदर्भात अजित पवार यांच्या बैठकाही चालू होत्या. राज्याने आर्थिक शिस्त पाळली पाहिजे याकडे त्यांचा कटाक्ष होता. पवार यांचे अर्थसंकल्प सादरीकरणाचे भाषण तडाखेबंद असे. अर्थसंकल्पामध्ये कुठल्या वर्गावर अन्याय होणार नाही, याकडे त्यांचा कटाक्ष असे. त्यांनी नेहमीच विकास प्रकल्पांना आणि राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य दिले आहे.
वर्ष २०२४-२५ सालच्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने जाहीर केली. २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना मासिक १५०० रुपये देण्याच्या या योजनेमुळे महायुती सरकारच्या हाती पुन्हा राज्याची सत्ता आली. तेव्हापासून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचाही रंग गुलाबी झाला. कोविड-१९ च्या संकटादरम्यान, जेव्हा अनेक राज्ये आर्थिक अडचणींचा सामना करत होती, तेव्हा पवार यांच्या आर्थिक शिस्तीचे कौतुक झाले.
दादांचा विक्रम हुकला :
१५ व्या महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाल २०२९ पर्यंत आहे. अजित पवार यांच्याकडे वित्तमंत्री पद होते. महायुती सरकारच्या उर्वरीत कार्यकाळात आणखी ४ अर्थसंकल्प सादर करण्याची अजित पवार यांना संधी होती. काळाने त्यांच्यावर घाला घातला नसता तर वर्ष २०२९ मध्ये त्यांनी त्यांचा १५ वा अर्थसंकल्प सादर करुन बॅ. शेषराव वानखेडे यांचा विक्रम मोडला असता.
अर्थसंकल्प मांडणारे मंत्री :
बॅ. शेषराव वानखेडे-काँग्रेस १३, अजित पवार -राष्ट्रवादी ११, जयंत पाटील- राष्ट्रवादी १०, सुशिलकुमार शिंदे -काँग्रेस ९, बॅ. रामराव आदीक -काँग्रेस ७, सुधीर मुनगंटीवार-भाजप ६, मधुकरराव चौधरी -काँग्रेस ५, यशवंत मोहिते -काँग्रेस ४, एकनाथ खडसे-भाजप ३, स. गो. बर्वे -काँग्रेस २, महादेव शिवणकर-भाजप २, दिलीप वळसे पाटील -राष्ट्रवादी २, देवेंद्र फडणवीस -भाजप १, व्ही. सुब्रमण्यम – काँग्रेस १ या नेत्यांनी आजपर्यंत राज्याचे अर्थसंकल्प सादर केलेले आहेत.

