काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या आरोपाला दुजोरा देताना उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसच्या मंत्र्यांनाही त्रास दिल्याचा गंभीर आरोप केला. यावर आता स्वतः अजित पवार यांनी नाना पटोले यांचं नाव न घेता प्रत्युत्तर दिलं आणि तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मंत्र्यांना, आमदारांना त्रास दिल्याचे आरोप फेटाळून लावले. मित्र पक्षातील लोकांनी माध्यमांशी बोलण्यापेक्षा बैठकीत विषय मांडला असता तर तेव्हाच गैरसमज दूर केले असते, असंही नमूद केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार म्हणाले, “आमच्या मित्र पक्षातील काही लोक अजित पवारांनी निधीबाबत असं केलं तसं केलं अशी वेगळी विधानं करत आहेत. मला महाराष्ट्रातील तमाम जनतेला सांगायचं आहे, सरकार अडीच वर्षापूर्वी अस्तित्वात आलं तेव्हा ३६ पालकमंत्री नेमण्यात आले. यात तिन्ही पक्षांना प्रत्येकी १/३ पालकमंत्रीपदं दिले. त्यांना निधी देताना मागील अडीच वर्षात कुठेही काटछाट केली नाही. जो निधी अर्थसंकल्पात मंजूर केला तो सर्व निधी दिला. परंतु तरीही त्यांनी असं वक्तव्य केलं मला माहिती नाही.”

“माध्यमांशी असं बोलण्यापेक्षा बैठकीत विषय मांडला असता तर…”

“मी कधीही दुजाभाव केला नाही. उलट मी सर्वांना विकासकामात मदत करण्याची भूमिका घेतली. अनेकदा मी साडेआठ नऊलाच कार्यालयात येऊन बसतो. बैठक घेऊन, चर्चा करून जे प्रश्न सोडवता येतील ते सोडवतो. त्यांनी माध्यमांशी असं बोलण्यापेक्षा आमच्या बैठकीत विषय मांडला असता तर तिथल्या तिथं गैरसमज दूर झाले असते. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, मी आणि शिवसेनेचे काही प्रमुख असे एकत्र चर्चा करायचो. तेव्हा ते बोलले असते तर तिथल्या तिथं गैरसमज दूर झाले असते.”

“अशा काळात तिन्ही पक्षांनी आघाडी कशी टिकेल आणि आत्ताची परिस्थिती कशी हाताळता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.

अजित पवार पुढे म्हणाले, “सुरुवातीच्या काळात १७० आमदारांच्या पाठिंब्यावर हे सरकार अस्तित्वात आलं. त्यात शरद पवार यांनी पुढाकार घेतला होता. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की उद्धव ठाकरे या सरकारचे प्रमुख म्हणून राहतील. तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी राहायचं. जो आमदार ज्या मतदारसंघातून निवडून आला त्यांना अडथळा आणायचा नाही, अशी भूमिका आम्ही घेतली होती.”

“आमदाराला कुठं त्रास होऊ नये हाच प्रयत्न होता”

“काही भागात एखाद्या ठिकाणी जेथे आमदार एका पक्षाचा आला आणि तिथली नगरपालिका दुसऱ्या पक्षाची आहे तिथं थोडंसं काही घडलं असेल. परंतु त्यात आमदाराला कुठं त्रास होऊ नये हाच प्रयत्न करण्यात आला आहे,” असंही अजित पवार यांनी नमूद केलं.

“राष्ट्रवादी काँग्रेसचा शेवटपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा”

अजित पवार म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसचा शेवटपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा राहील. माझं दुपारी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंशी बोलणं झालं आहे. मी माध्यमांना विनंती करतो की आमची वेगळी भूमिका नाही. शिवसेनेत काय सुरू आहे ते वेगवेगळे नेते सांगत आहेत. काही आमदार परत आले आहेत. त्यांनी तिथं काय झालं ते सांगितलं आहे.”

हेही वाचा : “अजित पवारांनी आमच्याही मंत्र्यांना त्रास दिला होता”; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

आजपर्यंत शिवसेनेत बंड करणारे सहकारी परत निवडून आले नाहीत : अजित पवार

“आजपर्यंत शिवसेनेत जेव्हा जेव्हा बंड झाला तेव्हा नेते एका बाजूला गेले, शिवसैनिक त्यांच्यामागे गेले नाही. मी राजकारणात आल्यानंतर हे तिसरं बंड आहे. एक छगन भुजबळ यांनी केलेलं बंड, दुसरं नारायण राणे यांनी केलेलं बंड आणि तिसरं एकनाथ शिंदे यांचं बंड आहे. यावरून असं दिसतं की बंड करणारा प्रमुख नेता एकवेळ टिकतो, पण बंड करणारे इतर सहकारी नंतर निवडून देखील येत नाहीत अशापद्धतीने शिवसैनिक कष्ट घेतात,” असं म्हणत अजित पवार यांनी बंडखोरांना सूचक इशाराही दिला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar answer allegations of nana patole amid maharashtra political crisis pbs
First published on: 23-06-2022 at 21:07 IST