दसऱ्याच्या निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा देण्यासोबतच राज्यभरातील नागरिकांमध्ये आज मुंबईत दोन मैदानांवर धडाडणाऱ्या दोन तोफांच्याही जोरदार चर्चा रंगत आहेत. एकीकडे शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं भाषण तर दुसरीकडे बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदेंचं भाषण होणार आहे. दोन्ही बाजूंनी मेळाव्यांना ऐतिहासिक गर्दी होणार असल्याचे दावे करण्यात आले आहेत. या दोन्ही भाषणांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना त्यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दोन्ही प्रमुख नेत्यांना आवाहन केलं आहे. तसेच, कटुता संपण्याविषयीही अजित पवारांनी सूचक भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क आणि बीकेसी मैदानावर जोरदार तयारी सुरू असून संध्याकाळी किती गर्दी होणार? आणि दोन्ही नेते भाषणांमध्ये काय बोलणार? या दोन प्रमुख प्रश्नांची चर्चा सध्या सुरू आहे. त्यासोबतच, एकाच वेळी मुंबईत दोन ठिकाणी इतके मोठे इव्हेंट होत असल्यामुळे प्रशासनावरही व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त ताण येणार असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पातळीवर दोन्ही नेत्यांना अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना सल्ला दिला आहे.

“तुमच्या दसरा मेळाव्यातील भाषणासाठी काही मुद्दे…”, भाजपाचा उद्धव ठाकरेंना खोचक सल्ला; भाषणावरून लगावला टोला!

“दोघांनी आपापली ताकद दाखवावी, पण..”

“दसऱ्याच्या दिवशी त्या दोघांनी समंजस भूमिका घ्यावी. जरूर त्यांनी आपापली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आपल्या पक्षाची भूमिका जनतेसमोर ठेवण्याचा अधिकार आहे. पण कुणाच्याहीबद्दल अनादराची भावना न दाखवता जी महाराष्ट्राची परंपरा आहे, तिला कुठेही बाधा लागणार नाही, डाग लागणार नाही, कमीपणा येणार नाही, कटुता वाढणार नाही अशा प्रकारे प्रत्येकाने वागावं असं आवाहन मी करेन”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

विश्लेषण: दसरा मेळाव्याची मुहूर्तमेढ केव्हा रचली? पहिल्या मेळाव्यात बाळासाहेबांना होती ‘ही’ भीती

“पुढाकार कुणी घ्यायचा, हा महत्त्वाचा मुद्दा!”

“हे वाद आता इतके पराकोटीला गेले आहेत. त्यात कुणी पुढाकार घ्यायचा, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. शब्दानं शब्द वाढत जातो. एकानं आरे म्हटल्यावर पुढच्यानं कारे म्हणायचं. त्यातून ते इतकं खालपर्यंत जातं, की खालच्याही लोकांना वाटतं की आपण एकमेकांचे शत्रू झालो. असं नाहीये. तेवढ्यापुरतं आपापल्या भूमिका सांगण्याचं काम प्रत्येकानं करावं. पण एकदा राजकीय जोडे बाजूला ठेवले की सगळ्यांनी एकमेकांना सलोख्याच्या भावनेतून पाहावं”, असाही सल्ला अजित पवारांनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना दिला.

“कुठलीही गोष्ट फार काळ टोकाची राहात नाही”

“शेवटी प्रत्येकाची काय भूमिका आहे, काय उद्दिष्ट आहे हेही महत्त्वाचं असतं. कुठलीही गोष्ट फार काळ टोकाची राहात नाही. जसजसे दिवस पुढे जातील, तशी त्यातली कटुता कमी होईल. पोटनिवडणूक १३ नोव्हेंबरला लागली आहे. त्या निवडणुकीच्या निकालावरही सगळ्यांचं लक्ष राहील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालावरही बरंच अवलंबून राहील. चिन्ह गोठवलं जाणार का? हेही महत्त्वाचं आहे”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar appeals shivsena uddhav thackeray cm eknath shinde dussehra melawa 2022 shivaji park bkc pmw
First published on: 05-10-2022 at 10:51 IST