scorecardresearch

विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी राज्यपालांना पुन्हा साकडे

विधानसभा अध्यक्षपदाकरिता महाविकास आघाडी सरकारने बुधवारचा दिवस निश्चित केला आहे

भगतसिंह कोश्यारी

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला परवानगी द्यावी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सोमवारी भेट घेऊन त्यांना पुन्हा विनंती केली. राज्यपालांच्या  भूमिकेवरच बुधवारच्या निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे.

विधानसभा अध्यक्षपदाकरिता महाविकास आघाडी सरकारने बुधवारचा दिवस निश्चित केला आहे. तशी शिफारस मंत्रिमंडळाने राज्यपालांना केली होती. विधानसभा नियम ६ (१) नुसार अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख राज्यपाल निश्चित करतात. या तरतुदीनुसारच राज्यपालांनी निवडणुकीची वेळ निश्चित करावी म्हणून सत्ताधाऱ्यांचा पाठपुरावा सुरू आहे. गेल्या आठवडय़ात तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. आज पुन्हा अजित पवार व अशोक चव्हाण यांनी राज्यपालांची भेट घेऊन निवडणुकीला मान्यता द्यावी अशी विनंती केली. या भेटीच्या वेळी राज्यपाल कोश्यारी यांनी गेल्या दोन दिवसांत शरद पवार आणि अजित पवार यांनी राज्यपालांबद्दल केलेल्या विधानांबद्दल नापसंती व्यक्त केली. तसेच सरकारच्या भूमिकेबाबतही विचारणा केल्याचे समजते. तसेच अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत काहीच ठोस आश्वासन दिले नाही. राज्यपालांकडून मंगळवारी सकाळपर्यंत परवानगी मिळाल्यास बुधवारी निवडणूक पार पडू शकते. कारण राज्यपालांकडून परवानगी मिळाल्यावरच मंगळवारी दुपारी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येऊ शकेल. अध्यक्षपदाकरिता गुप्तऐवजी खुल्या पद्धतीने मतदान घेण्याच्या नियमातील बदलास राज्यपालांनी आक्षेप घेतला होता. हिवाळी अधिवेशनात याबाबत कायदेतज्त्रांचे मत मागविले होते.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajit pawar ashok chavan meet governor bhagat singh koshyari for assembly speaker election zws

ताज्या बातम्या