अलीकडेच शिवसेना ( ठाकरे गट ) नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला. याच मुद्द्यावर बोलताना भाजपा आमदार रमेश पाटील यांनी विधानपरिषेदत मोठं विधान केलं आहे. आमच्याकडे ‘निरमा वॉशिंग पावडर’ आहे. ती गुजरातमधून येते. त्यामुळे जो माणूस आमच्याकडे येणार तो स्वच्छ होतो, असं रमेश पाटील यांनी म्हटलं आहे. या विधानावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-भाजपा सरकारचा समाचार घेतला आहे.
विधानसभेत बोलताना अजित पवार म्हणाले, “काही सदस्यांच्या चौकशा सुरु होत्या, पण एकनाथ शिंदेंबरोबर भाजपाच्या सरकारमध्ये गेल्याने त्या बंद झाल्या. ते लगेचच स्वच्छ होऊन धुतल्या तांदळासारखे झाले. लोक बंद डोळ्याने बघत नाहीत. याचा फटका भाजपाला बसणार आहे.”
“अतुल भातखळकर यांनी भूषण देसाईंवर तीन हजार कोटी रूपयांचा भूखंड घोटाळा केल्याचा आरोप केला होता. आता ते भूषण देसाई शिंदे गटात गेल्यानं स्वच्छ झाले. तर, आमदार रमेश पाटलांनी विधानपरिषेदत बोलताना म्हटलं, भूषण देसाईंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत प्रवेश दिला. आमच्याकडे निरमा वॉशिंग पावडर आहे. ती गुजरातमधून येते. त्यामुळे आमच्याकडे जो साफ होईल,” असं सांगत अजित पवारांनी हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा : पीएम आवास योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी ईडीची मोठी कारवाई, संभाजीनगरमध्ये नऊ ठिकाणी छापेमारी
यावर एकनाथ शिंदेंनी म्हटलं, “तुमच्याकडेही पावडर आहे”. याला प्रत्युत्तर देताना अजित पवारांनी सांगितलं, “आमच्याकडं कोणतीही पावडर नाही. तुम्ही राज्याचं प्रमुख आहात. या प्रकरणाला हलक्यात घेऊ नका. आपण चेष्टेने घेतो. पण, राज्यातील जनता हे सर्व पाहत असते.”