scorecardresearch

“मी ब्राह्मणाला मुख्यमंत्री झालेला पाहू इच्छितो”; दानवेंच्या वक्तव्यानंतर अजित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले “तृतीयपंथी व्यक्ती…”

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी रावसाहेब दानवेंच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलीय.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी “मी ब्राह्मणाला मुख्यमंत्री झालेला पाहू इच्छितो” असं वक्तव्य केलं केलं. यानंतर या वक्तव्यावर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देखील रावसाहेब दानवेंच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलीय. “मुख्यमंत्री कोणीही होऊ शकतं. तृतीयपंथी व्यक्ती देखील मुख्यमंत्री होऊ शकतो,” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

अजित पवार म्हणाले, “मुख्यमंत्री कोणीही होऊ शकतं. तृतीयपंथी व्यक्ती देखील मुख्यमंत्री होऊ शकतो किंवा कुठल्याही जाती-धर्माची व्यक्ती, मुख्यमंत्री होऊ शकते. महिला देखील मुख्यमंत्री होऊ शकते आणि आपणही मुख्यमंत्री होऊ शकतात. १४५ आमदारांचं बहुमत आणा आणि राज्याचा प्रमुख व्हा.”

“असं कोणी काहीही सांगेल की मुख्यमंत्री अमक्याने व्हावं, तमक्याने व्हावं. अरे त्याने १४५ आमदार त्याच्या पाठिशी उभे केले, तर होईल ना तो मुख्यमंत्री. मग ती व्यक्ती कोणीही का असेना,”

रावसाहेब दानवे नेमकं काय म्हणाले होते?

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यात बोलताना मी ब्राह्मणाला या राज्याचा मुख्यमंत्री झालेलं पाहू इच्छितो, असे म्हटले. ३ मे रोजी जालन्यात परशुराम जयंतीनिमित्त एका कार्यक्रमात बोलत असताना दानवे यांनी हे वक्तव्ये केले. आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीत जालना शहरात ब्राम्हण समाजाच्या लोकांना एका पेक्षा जास्त नगरसेवकपदे द्या अशी मागणी ब्राह्मण समाजातील सुनील किंगावकर यांनी त्यांच्या भाषणादरम्यान केली होती. त्यावर बोलताना रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“महानगरपालिकेच्या निवडणुका आल्याने आमच्याकडे लक्ष ठेवा. वेगवेगळ्या ठिकाणी ब्राह्मणांना प्रतिनिधित्व द्या. एकापेक्षा जास्त ब्राह्मण जालना महापालिकेमध्ये निवडणून द्या असा आपल्या बोलण्याचा अर्थ होता. पण ही विनंती मला लागू होत नाही. कारण मी ब्राह्मणाला केवळ नगरसेवक किंवा नगराध्यक्ष झालेला पाहू इच्छित नाही. मी ब्राह्मणाला या राज्याचा मुख्यमंत्री झालेला पाहू इच्छितो,” असे रावसाहेब दानवे म्हणाले.

हेही वाचा : “मी ब्राह्मणाला मुख्यमंत्री झालेला पाहू इच्छितो”; दानवेंच्या वक्तव्यानंतर खोतकरांचा टोला,म्हणाले, फडणवीसांच्या..

दानवेंच्या वक्तव्यावर अर्जुन खोतकरांचा टोला

यावर तिथे उपस्थित असलेले माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवेंना टोला लगावला आहे. “खरं तर सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे परशुरामच आहेत. यापूर्वीचे मुख्यमंत्री मनोहर जोशी हे सुद्धा परशुरामच होते. त्यामुळे करु वगैरे या भानगडी सोडून द्या. माझ्याइतका देवेंद्र फडणवीसांच्या जवळचा कोणी मित्र असू शकेल असं मला वाटत नाही. ते मुख्यमंत्री होतील तर आम्हाला आनंदच आहे. त्यामुळे ज्याच्याकडे विद्वत्ता आहे तो पुढे जाऊ शकेल आणि या समाजामध्ये प्रचंड विदवत्ता आहे,” असे अर्जुन खोतकर म्हणाले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajit pawar comment on raosaheb danve remark about brahman cm of maharashtra pbs

ताज्या बातम्या