मुंबई : भाजपच्या घोटाळ्याची फाईल आपल्याकडे असून ती आपण उघड करणार असल्याचे पवार यांनी १५ जानेवारीला म्हटले होते. त्यानंतर पुढील दहा दिवसांत त्यांचा विमान अपघात मृत्यू झाला, असे गंभीर वक्तव्य करीत शिवसेना नेते खासदार संजर राऊत यांनी घातपाताची शंका व्यक्त केली आहे.
अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी विमान अपघाताबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांचा धागा पकडत राऊत म्हणाले, मिटकरी यांनी उपस्थित केलेले प्रश्न गंभीर स्वरूपाचे आहेत. अजित पवार यांच्यासारखा नेता विमानात बसताना त्यांच्यासोबत कुणीही प्रमुख व्यक्ती नाही, ओएसडी नाही. विमानाच्या मेंटेनन्सचे सर्टिफिकेट नाही. त्याच्यामुळे लोकांच्या मनात शंका येणारच. माझ्या मनातही पहिल्याच दिवशी शंका आली.
ज्या दिवशी अजित पवारांनी सांगितले की, भाजपच्या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे आणि योग्यवेळी उघड करेन तेव्हाच आपल्या मनात शंकेची पाल चुकचुकल्याचे ते म्हणाले. १९९५ च्या काळात सिंचन प्रकल्पासाठीची ततरतूद वाढवून भाजपने काही कोटी पक्ष निधीकडे कसे वळवले हे जेव्हा अजित पवार सांगत होते तेव्हा त्यांचे हावभाव पाहत होतो. १५ जानेवारीला त्यांनी हे सांगितले आणि पुढच्या १० दिवसात त्यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात एक रहस्यमय आहे, असे सांगतानाच या प्रकरणानंतर मला न्यायाधीश लोया यांची आठवण होत आहे. मी कुणावर आरोप करत नाही, पण या लोकांच्या मनातल्या शंका आहे, असेही राऊत म्हणाले.
अजित पवारांना पुन्हा शरद पवारांसोबत जायचे होते. त्यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचे स्वगृही जाणे हा भाजपचा पराभव असून देशातील राजकारणाला कलाटणी देणारा तो निर्णय ठरला असता आणि भाजपची दहशत मोडून गेली असती, अशी टिका राऊत यांनी केली. विलीनीकरणाबाबत अजित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली नसेल तर कारण त्यांच्यावर त्यांचा विश्वास नसेल, असाही टोला त्यांनी लगावला.

