scorecardresearch

“बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कायदा आणा”; अजित पवारांची मोठी मागणी; म्हणाले, “जे आमदार…”

राज्यपाल भगतसिंग कोश्यारींसह भाजपा नेत्यांनी शिवरायांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांविरोधात आज महाविकास आघाडीकडून महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

“बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कायदा आणा”; अजित पवारांची मोठी मागणी; म्हणाले, “जे आमदार…”
अजित पवार संग्रहित छायाचित्र

राज्यपाल भगतसिंग कोश्यारींसह भाजपा नेत्यांनी शिवरायांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांविरोधात आज महाविकास आघाडीकडून महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे करण्यात आला. यावेळी आयोजित सभेत बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवरून शिंदे-भाजपा सरकारला लक्ष केलं. तसेच बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी कडक कायदा आणावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

हेही वाचा – “…त्यांना शरम वाटली पाहिजे”, शरद पवारांचा राज्यपाल कोश्यारींवर हल्लाबोल!

“मागील काही दिवसांपासून ज्या पद्धतीने शिवरायांबाबत आणि इतर महापुरुषांबाबत विधानं करण्यात आली आहेत, ती बघून राज्यपालांना त्यांच्या पदावरून हटवले पाहिजे. जे आमदार, मंत्री अशी विधानं करत आहेत, त्यांनाही पदावरून हटवले पाहिजे. सोमवारपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेश सुरू होणार आहे. या अधिवेशनात राज्य सरकारने अशी बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कडक कायदा करावा. विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्याचे समर्थन करू”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

यावेळी बोलताना त्यांनी सीमावादाच्या मुद्द्यावरूनही शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केलं. “बेळगावसह सीमाभागातील ८६५ मराठी गावं महाराष्ट्रात आणण्याचा संघर्ष सुरू असताना अचानक ही गावं कर्नाटकात जाण्याचा मुद्दा कसा उपस्थित झाला? यासाठी टुलकीट कोणी दिली? याचाही राज्यातील नागरिकांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. अडीच वर्ष आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करत होतो. त्यापूर्वी विलासराव देशमुख, सुशील कुमार शिंदे, अशोक चव्हाण यांच्या बरोबर काम केलं. मात्र, तेव्हा कोणीही अशी मागणी केली नव्हती”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – MVA Mahamorcha: “उद्धव ठाकरेंचा पक्ष जसा नॅनो होतोय, तसा…”, देवेंद्र फडणवीसांचा ‘मविआ’च्या महामोर्चावर खोचक टोला!

“शिंदे-फडणवीस सत्तेत आल्यानंतर सीमेवरील गावं शेजारच्या राज्यात जातो म्हणायला लागली आहेत. अशा स्थितीत महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ कर्नाटक बॅंकेत खाती उघडण्याचा निर्णय कसा घेऊ शकतात? कर्नाटक सातत्याने आपल्यावर अन्याय करत आहेत. तरीही असा निर्णय घेतला जातो आहे. त्यामुळे तुमचं पुतना मावशीचं प्रेम सर्वांना कळलं आहे, अशी टीका अजित पवारांनी केली. एकंदरीत परिस्थिती बघता, या सरकारला त्यांची जागा दाखवण्याचे काम आपण सर्वांनी केलं पाहिजे”, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-12-2022 at 17:00 IST

संबंधित बातम्या