मुंबई : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले दावे – प्रतिदावे, उभय बाजूच्या नेतेमंडळींकडून केली जाणारी विधाने या पार्श्वभूमीवर अजित पवार गटातील नेत्यांनी विलीनीकरणास विरोध दर्शविला आहे. शरद पवार गटातील नेत्यांना सरकारमध्ये महत्त्वाची पदे देण्यास त्यांचा सक्त विरोध आहे.
अजित पवार यांच्या हयातीत राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती, असा दावा शरद पवार गटाच्या नेत्यांकडून केला जात आहे. शरद पवार यांनी १२ फेब्रुवारीचा मुहूर्त ठरला होता, असा दावा केला. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणास अजित पवार गटातील प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांचा तेव्हाही विरोध होता व अजूनही आहे. अजित पवारांच्या निधनानंतर या गटाच्या नेत्यांच्या बैठकीत विलीनीकरणावर विरोधी भूमिका घेण्यात आली. विलीनीकरणावर काही बाबतीत स्पष्टता यावी, अशी या नेत्यांची भूमिका आहे.
विलीनीकरणानंतर शरद पवार गटाच्या आमदारांना मंत्रीपद मिळणार असल्यास त्याला अजित पवार गटाच्या आमदारांचा आक्षेप आहे. २०२३ मध्ये अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतली तेव्हापासून आम्ही त्यांना साथ दिली. आता मंत्रीपद मिळण्याची संधी येणार असल्यास शरद पवार गटाच्या नेत्यांनाच का संधी द्यावी, अशी त्यांची भूमिका आहे. अजित पवारांच्या निधनानंतर विलीनीकरणाची चर्चा शरद पवार गटाकडून सुरू करण्यात आली. तेव्हापासून अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सतत वेगळा सूर लावला आहे. दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी ही फक्त महानगरपालिका निवडणुकांपुरतीच मर्यादित होती’, ‘भाजप किंवा रालोआबरोबर येण्याचा शरद पवार गटाला निर्णय घ्यावा लागेल’ अशी विधाने तटकरे यांनी केली आहेत. विलीनीकरणानंतर एकत्रित राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद तटकरे यांच्याकडे ठेवू नये, अशी शरद पवार गटाची मुख्य अट होती, असे सांगण्यात येते.
राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विलीनीकरणाला असलेला विरोध लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादात उडी घेत नकारात्मक भूमिका घेतली. यावरून भाजपलाही शरद पवार बरोबर येणे फायद्याचे नसेल. शरद पवारांकडे एकत्रित राष्ट्रवादीची सूत्रे जाऊ नयेत म्हणूनच भाजपच्या इशार्यावरून काही महत्त्वपूर्ण घडामोडी लगेचच घडल्याचे बोलले जाते.
शरद पवारांचे फडणवीसांना प्रत्युत्तर
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची काही माहिती नव्हती. अजित पवारांनी याची आम्हाला कधीच कल्पना दिली नव्हती, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या कृतीत खोडा घातला होता. त्यावर विलीनीकरणाच्या चर्चेत जे सहभागी नव्हते त्यांना याबद्दल कशी माहिती असणार, असे प्रत्युत्तर शरद पवारांनी फडणवीस यांना अनौपचारिक चर्चेत दिले.

