पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बुधवारी मुंबईमध्ये भेट झाली. या भेटीनंतर काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए)अस्तित्वाबद्दल ममता बॅनर्जी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असले तरी भाजपच्या विरोधात लढण्यासाठी कोणालाही वगळण्याचा प्रश्नच नाही, अशी भूमिका मांडून पवार यांनी काँग्रेसबद्दल काहीसा सावध पवित्रा घेतल्याचं पहायला मिळालं. याच भेटीसंदर्भात आणि चर्चेबद्दल राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला. त्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी आपल्या खास शैलीमध्ये दोन्ही नेते मोठे नेते असून आपण यावर काय बोलणार अशी भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं.

नक्की वाचा >> “मला एक कळत नाही…”; ममता बॅनर्जीसंदर्भातील त्या प्रश्नावरुन अजित पवारांचा सवाल

बुधवारी मुंबईमध्ये ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांची भेट झाली त्याबद्दल काय प्रतिक्रिया द्याल?, असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना अजित पवार यांनी, “मी त्याबद्दल फार काही बोलणार नाही. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार तिथे होते,” असं सांगितलं.

पुढे बोलताना, “आता या राष्ट्रीय पातळीवरील व्यक्तींनी काही वक्तव्य केलेलं असेल तर राज्यात काम करणारे आम्ही काय वक्तव्य करायचं? ते मोठे नेते आहेत त्यांनी काय वक्तव्य केलं असेल त्याबद्दल त्यांनाच प्रश्न विचारलेलं जास्त चांगलं,” असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> ओमायक्रॉनसंदर्भातील नियमांवरुन केंद्र आणि राज्य सरकार आमने-सामने?; अजित पवार म्हणतात…

ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यावर आक्षेप घेणाऱ्या भाजपा नेत्यांनाही अजित पवार यांनी एक प्रश्न यावेळी विचारला. महाविकास आघाडी सरकारच्या मदतीने महाराष्ट्रातील उद्योग हे पळवले जात आहेत अशी टीका करण्यात आली, असं म्हणत पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी, “मला एक कळत नाही, इतर राज्यातील मुख्यमंत्री आले म्हणजे ते उद्योगधंदे पळवायला आले हा अर्थ कसा काय निघतो?” असा प्रतिप्रश्न केला.