मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी विमान अपघात तपास विभागाचा (एएआयबी) अंतिम चौकशी अहवाल येत नाही, तोपर्यंत यासंदर्भात कोणतेही आदेश देऊ शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. त्यानंतर या दुर्घटनेच्या सखोल चौकशीची मागणी करणाऱ्या दोन स्वतंत्र जनहित याचिका मागे घेण्यात आल्या.
याचिकेतील मुख्य मागण्या पूर्ण झाल्याने सध्या या याचिकांची गरज नाही, असेही प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. तसेच, याचिका फेटाळण्यात येत असल्याचे नमूद केले. त्यानंतर, दोन्ही याचिका मागे घेत असल्याचे याचिकाकर्त्यंच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. त्याला न्यायालयाने परवानगी दिली.
दरम्यान, अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यूच्या चौकशीच्या मागणीसाठी माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर आणि भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी स्वतंत्र जनहित याचिका दाखल केल्या होत्या. याप्रकरणी रीतसर गुन्हा दाखल करण्याची मागणी तिरोडकर यांनी केली होती, तर पाटील यांनी प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सोपवण्याची मागणी केली होती. तसेच, अपघातासाठी जबाबदार विमान कंपनी व इतर संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्याचीही मागणी पाटील यांनी केली होती.
