राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनात बोलताना पेपरफुटी प्रकरणात महत्त्वाचं विधान केलंय. नोकरभरतीतील पोलीस तपास योग्य दिशेने सुरू असल्याचं सांगतानाच अजित पवारांनी दोषींची गय करणार नसल्याचं सांगितलं. तसेच पेपरफुटी प्रकरणाची पाळेमुळे खणून काढू आणि दोषींवर कडक कारवाई करू, अशी स्पष्ट भूमिका मांडली. यावेळी त्यांनी अधिवेशनात राज्यातील इतर मुद्यांवरही भाष्य केलं.

अजित पवार म्हणाले, “राज्यातील नोकरभरती प्रक्रियेसह पेपरफुटीच्या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून योग्य दिशेने सुरु आहे. या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्यात येणार आहेत. या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. ‘एमपीएससी’वरील ताण लक्षात घेता ‘एमकेसीएल’, ‘आयबीपीएस’ आणि ‘टीसीएल’ या मान्यताप्राप्त कंपन्यांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने राबविण्यात येईल. पोलीस दलाची भरती प्रक्रिया त्यांच्याच विभागामार्फत होईल.”

Mumbai, soil, Shivaji Park,
मुंबई : ते मत मागायला येतील, तुम्ही माती काढायला सांगा! शिवाजी पार्कच्या रहिवाशांचा निवडणूक पवित्रा
The discussion that the constitution will be changed again after the BJP raised slogans in the Lok Sabha elections has spread unrest among the Dalit community
दलित समाजात अस्वस्थता; भाजपच्या ‘चार सौ पार’च्या घोषणेने संविधान बदलाची चर्चा
Vinod Tawde reply that opponents are spreading propaganda about
भाजपबाबत विरोधकांचा अपप्रचार; काँग्रेस राजवटीत ८० घटनादुरुस्त्या; विनोद तावडे यांचे प्रत्युत्तर
mangroves survey in mumbai
खारफुटीचे नव्याने सर्वेक्षण; महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर सर्वेक्षण करणार

“विदर्भ, मराठवाड्याच्या विकासनिधीत कुठलीही कपात नाही “

“विदर्भ-मराठवाडा व उर्वरीत महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातंर्गत निदेशानुसार घालून दिलेल्या निकषापेक्षा अधिकच्या निधीची तरतुद विदर्भ-मराठवाड्यासाठी करण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या विकासनिधीत कुठलीही कपात केलेली नाही. राज्याच्या एकसंध विकासासाठी महाविकास आघाडी सरकार कटीबध्द आहे. विदर्भ-मराठवाड्याच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

“शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचा वीजपुरवठा चालू करण्यात येईल, मात्र…”

अजित पवार म्हणाले, “शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्यसरकार खंबीरपणे उभे असून नैसर्गिक आपत्तीकाळात शेतकऱ्यांना ‘एसडीआरएफ’च्या निकषापेक्षा अधिकची मदत सरकारने केली आहे. रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचा वीजपुरवठा चालू करण्यात येईल, मात्र त्यांना किमान चालू थकीत वीजबील भरावे लागेल. चालू वीजबील भरल्यानंतर कृषीपंपांचा खंडीत वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येईल.”

“एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाची भूमिका न घेता संप मागे घ्यावा”

एसटी महामंडळाचे कर्मचारी आपलेच आहेत. त्यांच्या पगारात भरीव वाढ केली असून एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाची भूमिका न घेता संप मागे घेण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत नियम २९३ अन्वये उपस्थित करण्यात आलेल्या चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यासमोरील अनेक महत्वाच्या प्रश्नांवरील सरकारची भूमिका स्पष्ट केली.

चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विदर्भ-मराठवाडा उर्वरीत महाराष्ट्र विकास महामंडळाचा कार्यकाल संपला असला तरी महामंडळाच्या उद्दीष्टांची पूर्ती राज्य सरकार करीत आहे. विदर्भ मराठवाड्याच्या विकासासाठी कार्यक्षेत्रातंर्गत निदेशीत करण्यात आलेल्या निधीपेक्षा अधिकच्या निधीचे वितरण करण्यात आले आहे. राज्यशासनाने आर्थिक वर्ष २०२१-२२ करता लोकसंख्येच्या प्रमाणात विदर्भासाठी २३ टक्के निधी देणे अपेक्षित असताना २६ टक्के निधी वितरीत केला. मराठवाड्यासाठी १८ टक्के निधी देणे अपेक्षित असताना १८ टक्केच निधी दिला. उर्वरीत महाराष्ट्रासाठी ५८.२३ टक्के निधी देणे अपेक्षित असताना ५५.३८ टक्के निधीचे वितरण करण्यात आले आहे असे सांगितले.

“उर्वरीत महाराष्ट्रासाठी केवळ ४३.६२ टक्के निधी प्रत्यक्ष खर्च”

यासंदर्भात अधिक माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सन २०१३-१४ ते सन २०१७-१८ या पाच वर्षाच्या कालावधीत विदर्भासाठी सरासरी २४.८५ टक्के, मराठवाड्यासाठी सरासरी १५.४२ टक्के तर उर्वरीत महाराष्ट्रासाठी केवळ ४३.६२ टक्के निधी प्रत्यक्ष खर्च करण्यात आला होता. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कोकण आणि उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र विकास महामंडळ निर्माण करण्याची मागणी राज्य सरकारच्यावतीने करण्यात आली असल्याची माहीतीही दिली.

“‘एसडीआरएफ’च्या निकषापेक्षा अधिकची मदत”

गेल्या दोन वर्षात राज्यातील जनतेला चक्रीवादळे, पूरस्थिती, अतिवृष्टी, दरड कोसळणे अशा अनेक संकटांचा सामना करावा लागला. या नैसर्गिक संकटाच्या काळात ‘एसडीआरएफ’च्या निकषापेक्षा गतवर्षी १ हजार ७७४ कोटी रुपये तर, यंदा चालूवर्षी १ हजार १९० कोटी रुपयांची अधिकची मदत राज्यातील जनतेला केली आहे. या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांमध्ये त्यासाठी ६ हजार कोटींची तरतुद करण्यात आली आहे. नैसर्गिक संकटाच्या काळात नुकसानग्रस्तांना अधिकची मदत मिळण्यासाठी ‘एसडीआरएफ’च्या निकषात वाढ करण्याची मागणी राज्य सरकारच्यावतीने केंद्रसरकारकडे केली असल्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

“मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प”

मराठवाड्याचा पिण्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प बंद केला जाणार नाही, तो टप्प्या-टप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे मराठवाड्यातील सर्व प्रकल्पातील पाण्याची स्थिती चांगली आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

“पीक विमा योजना”

पंतप्रधान पीक विमा योजना व्यवहार्य नाही, असे अनेक जाणकार, तज्ज्ञांचे मत आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेतून बिहार, पश्चिम बंगाल, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक, सिक्कीम, मणिपूर ही राज्ये बाहेर पडली आहेत. अरुणाचल प्रदेश, झारखंड, मेघालय, मिझोराम, नागालँड, पंजाब व तेलंगणा या राज्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी, संकटाच्या काळात शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत मिळवून देणारा पीक विमा योजनेला दुसरा पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

“केंद्राकडून ३१ हजार ६२४ कोटी रुपयांचा ‘जीएसटी’चा परतावा बाकी”

कोरोना संकटासह अनेक नैसर्गिक संकटांचा सामना राज्याने यशस्वीपणे केला आहे. कोरोनामुळे राज्यासमोर आर्थिक आव्हाने निर्माण झाली आहेत. मात्र सर्व संकटावर मात करुन विकासकामे सुरु आहेत. पायाभूत प्रकल्पांचा वेग कायम ठेवण्यात आला आहे. आर्थिक शिस्तही बिघडू दिलेली नाही, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. केंद्राकडून राज्याच्या हक्काचा असणारा ३१ हजार ६२४ कोटी रुपयांच्या ‘जीएसटी’चा परतावा बाकी असल्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चेच्या उत्तरात दिली.