मुंबई – पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात भाजपचे षडयंत्र आहे. या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत सरकारमधून बाहेर पडण्याची भाषा केली, असा दावा विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

‘वर्षा’वरील बैठकीची माहिती आपल्या कानावर आली आहे. पार्थ पवार प्रकरणी शरद पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया बोलकी आहे. थेट मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतल्याशिवाय पार्थ पवार वाचू शकत नाहीत. ‘वर्षा’ बंगल्यावर जी बैठक झाली त्यात अजित पवारांनी संतप्त भूमिका घेतली होती. यात त्यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचीही भाषा केली. अजित पवारांनी रागाने सरकारमधून बाहेर पडून बाहेरून सरकारला पाठिंबा देऊ असे म्हटल्याने त्यांना आणि पार्थ पवारांना वाचवले जात असल्याचा दावा दानवे यांनी केला.

पार्थ पवारांना गुन्हेगार म्हणून वागणूक द्या

पुण्यातील प्रकरणाबाबत भाजपला माहिती होती, हे सर्व उघड झाल्यानंतर अजित पवार अडचणीत येतील हा त्यांचा उद्देश होता. ही त्यांची व्यूहरचनाच आहे. आता अजित दादांची फाईल तयार केली आहे. उद्या जर अजित पवारांनी काही केले तर एक मिनिटात पार्थ पवारांना अटक होऊ शकते. हे भाजपाचे षड्यंत्र आहे. त्यातूनच पार्थ पवार प्रकरण बाहेर आले असल्याचे दानवे म्हणाले. भाजपानेच प्रकरण बाहेर काढायचे, संबंधितांनी आपले ऐकले पाहिजे अशा दृष्टीने प्रयत्न करायचे. एकीकडे महार वतनाची जमीन विकली जाते. कंपनीचा संचालक म्हणून पार्थ पवार यांच्यावर कारवाई का होत नाही. मुंद्राक शुल्क माफ केले जाते. दुसरीकडे व्यवहार रद्द झाला सांगतात, मात्र कायद्याने व्यवहार रद्द झाला तरीही मुंद्राक शुल्क भरावेच लागेल असे अधिकारी सांगतायेत. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी जी भूमिका घेतली ती चूक आहे. लोकसभा लढणारा माणूस बाळ नाही. एक भारताचा नागरीक आणि गुन्हेगार म्हणून त्यांना वागवले पाहिजे, अशीही मागणीही दानवे यांनी केली.

अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडण्याची स्थिती निर्माण करणार -वडेट्टीवार

निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या पक्षाचा घोटाळा बाहेर काढून त्यांची कोंडी करण्यात आली आहे. येणाऱ्या निवडणुकीत पुणे, पिपंरी, चिंचवड, सातारा, सांगली, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पक्षाने भाजप पुरक भूमिका घ्यावी या हिशेबाने अजित पवार यांचा पक्ष कमजोर करण्याचा डाव दिसत आहे. येत्या काळात महायुतीत सगळ्यात पहिला आघात अजित पवार यांच्या पक्षावर होईल आणि त्यांना सत्तेतून बाहेर पडण्याची वेळ त्यांच्यावर आणली जाईल, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही अजित पवार यांच्यावर टीका केली. राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारमध्ये अंतर्गत वाद पराकोटीला गेले आहेत, पण सत्तेसाठी हे सर्वजण एकत्र आहेत. सत्तेसाठी काहीही वाट्टेल ते अशी त्यांची भूमिका आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्तेसाठी लाचार आहेत. त्यामुळे सत्ता सोडऊन ते राहू शकत नसल्यानेच ते सत्तेमधून बाहेर पडणार नाहीत, असे ते म्हणाले.