मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बिहारमध्ये स्वबळावर १६ उमेदवार उभे केले होते, मात्र बहुतांश उमेदवारांना दखलपात्र कामगिरी करता आली नसून त्यांना आपली अनामत रक्कम (डिपॉझीट) सुद्धा वाचवता आली नाही. पक्षफुटीनंतर पक्षाचा राष्ट्रीय दर्जा प्राप्त करण्यासाठी अजित पवार यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत यावेळी उमेदवार उभे केले होते, मात्र खराब कामगिरीमुळे त्यांचे स्वप्न भंगले.
अखंड राष्ट्रवादी असताना शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने गोवा, बिहार, गुजरात, दिव-दमण येथे बऱ्यापैकी हातपाय पसरले होते. मात्र पक्ष फुटीनंतर पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेला. हा दर्जा परत मिळावा या उद्देशाने बिहारमध्ये १६ उमेदवार उभे केले होते. त्यामध्ये महुआ, पिंप्रा आणि मनिहारी या तीन मतदारसंघातील उमेदवारांनी किमान हजार मताचा तरी टप्पा ओलांडला आहे. बाकी १३ उमेदवार तर २०० ते ९०० मतांच्या दरम्यान आहेत.
अनेक मतदारसंघात ‘नोटा’पेक्षा अल्प मतदान राष्ट्रवादीच्या उमेदवाराला आहे. बिहारमधील निवडणुकीची जबाबदारी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर होती. अजित पवारांचा राष्ट्रवादी महाराष्ट्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत (एनडीए) आहे, पण बिहारमध्ये तो स्वबळावर लढला होता. यावर पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्त म्हणाले की, ‘या निवडणुकीत महाराष्ट्रातील एकही स्टार प्रचारक बिहारमध्ये नव्हता. राष्ट्रवादीचे सर्व १६ उमेदवार स्वत:च्या बळावर लढले’.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बिहारमध्ये अवघी ०.०३ टक्के मते मिळाली आहेत. तर ‘नोटा’ला (कुणीही पसंत नाही) राष्ट्रवादीपेक्षा अधिक म्हणजे १.८२ टक्के मते आहेत. शरद पवार पक्षाध्यक्ष असताना बिहारमध्ये पक्षाचा आमदार व खासदारही निवडून आलेला आहे. उमेदवाराला आपली अनामत रक्कम वाचण्यासाठी मतदान झालेल्या मतांपैकी किमान १६.६६ टक्के मते प्राप्त करणे आवश्यक असते. परंतु राष्ट्रवादीचा १६ पैकी एकही उमेदवार किमान १/६ मतदान प्राप्त करु शकला नाही. एकुणच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला राष्ट्रीय दर्जा मिळवणे इतके सहज शक्य नाही.
विजयामागे लाडक्या बहिणी : अजित पवार
बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) मिळालेल्या ऐतिहासिक विजयामागे लाडक्या बहिणी या मुख्य आधार ठरल्या आहेत. बिहारच्या जनतेने ‘डबल इंजिन’ सरकारच्या कार्यप्रणालीवर पुन्हा विश्वास दाखवला. हा विजय सुशासन आणि सामाजिक न्यायाचा आहे. हा ‘एनडीए’च्या एकजुटीचा आणि स्थिर नेतृत्वाचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी बिहार निकालावर दिली.
