BMC Election 2026 Ajit Pawar NCP Full Candidate List: अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या मु्ंबई महानगर पालिका निवडणुकांसाठी अखेर भाजपा व अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं सूत जुळलं नसल्याचं स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रविवारी २८ डिसेंबर रोजी संध्याकाळी मुंबई महानगर पालिका निवडणूक २०२५ साठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये एकूण ३७ उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ज्या नवाब मलिकांना भारतीय जनता पक्षाचा तीव्र विरोध होता, त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांचा या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
कधी होणार महानगर पालिका निवडणुका?
गेल्या पाच वर्षांपासून पुढे ढकलल्या जाणाऱ्या मुंबई महानगर पालिका निवडणुका अखेर पुढच्या महिन्यात होऊ घातल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांनंतर राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली. यामध्ये पहिल्या टप्प्यात नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये भाजपाप्रणीत महायुतीमधील मित्रपक्षांचा वरचष्मा पाहायला मिळाला. आता पुढच्या महिन्यात १५ जानेवारी रोजी मुंबईसह राज्यभरातल्या २९ महानगर पालिकांसाठी मतदान पार पडणार असून १६ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत.
बावनकुळे म्हणतात, भाजपाचा मलिकांना विरोध नाही!
दरम्यान, नवाब मलिक यांच्यामुळेच भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी युती होऊ शकलेली नसल्याचं स्पष्ट झालं होतं. भाजपाच्या काही नेत्यांनी जाहीरपणे नवाब मलिक यांच्या मुंबईतील नेतृत्वाला विरोधही केला होता. मात्र, आता भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवाब मलिकांच्या नेतृत्वाला भाजपाचा विरोध नसल्याचं ‘लोकसत्ता’शी बोलताना नमूद केलं आहे. “नवाब मलिक यांच्यावर आरोप आहेत, पण ते सिद्ध झाले नाहीत. मुंबईत राष्ट्रवादीशी युती करायची नाही हे पूर्वीच दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत ठरले आहे”, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईसाठीची उमेदवार यादी!
| क्रमांक | वॉर्ड क्रमांक | उमेदवार |
| १ | ३ | मनीष दुबे |
| २ | ४० | विलास घुले |
| ३ | ४८ | सिरील डिसोझा |
| ४ | ५७ | अजय विचारे |
| ५ | ६२ | अहमद खान |
| ६ | ६४ | हदिया कुरेशी |
| ७ | ७६ | बबन मदने |
| ८ | ७७ | ममता ठाकूर |
| ९ | ८६ | सुभाष पाताडे |
| १० | ९२ | युसूफ मेमन |
| ११ | ९३ | सचिन तांबे |
| १२ | ९५ | अमित पाटील |
| १३ | ९६ | आयेशा खान |
| १४ | १११ | धनंजय पिसाळ |
| १५ | १०९ | सज्जू मलिक |
| १६ | १२६ | प्रतिक्षा घुगे |
| १७ | ११३ | शोभा जाधव |
| १८ | १३९ | नागरत्न बनकर |
| १९ | १२५ | हरिश्चंद्र जंगम |
| २० | १४२ | चांदणी श्रीवास्तव |
| २१ | १३५ | अक्षय पवार |
| २२ | १४४ | दिलीप पाटील |
| २३ | १४० | ज्योती सदावर्ते |
| २४ | १४७ | अंकिता द्रवे |
| २५ | १४३ | रचना गवस |
| २६ | १५२ | लक्ष्मण गायकवाड |
| २७ | १४६ | भाग्यश्री केदारे |
| २८ | १६८ | सईदा खान |
| २९ | १४८ | सोमू पवार |
| ३० | १७० | बुशरा मलिक |
| ३१ | १६५ | अब्दुल रशीद (कप्तान) मलिक |
| ३२ | १७५ | वासंथी देवेंद्र |
| ३३ | १६९ | चंदन पाटेकर |
| ३४ | २२२ | किरण शिंदे |
| ३५ | १७१ | दिशा मोरे |
| ३६ | २९७ | फरीन खान |
| ३७ | २२४ | सबिया मर्चंट |
नवाब मलिकांच्या कुटुंबात तिघांना उमेदवारी
“२०१७ ला १६५ मधून मी उमेदवार होते. माझ्या आत्या सईदा खान व माझे काका कप्तान मलिक हेही उमेदवार होते. आता त्या दोघांची उमेदवारी पुन्हा दिली जात असून कप्तान यांच्या सून बुशरा मलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे”, अशी माहिती नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांनी दिली आहे. “मुंबईत स्वबळावर निवडणूक लढण्यासंदर्भात आमच्याशी बोलणं झालं आहे. पण त्यासंदर्भात अंतिम निर्णय झाल्यास आमच्या कुटुंबातून हे तिघे मुंबई महानगर पालिका निवडणूक लढवतील”, असंही त्यांनी नमूद केलं.
