मुंबई : महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाने मुंबई महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने ३७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात अल्पसंख्याक उमेदवारांना अधिक प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. पक्ष १०० जागा लढण्याच्या तयारीत आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीतून लढण्याची अजित पवार गटाची तयारी होती. पण नवाब मलिक यांच्याकडे पक्षाची सूत्रे ठेवू नयेत, अशी भाजपची अट होती. अजित पवार व सुनील तटकरे यांना ही अट मान्य नव्हती. तशीही मुंबईत अजित पवार गटाची ताकद मर्यादित आहे. यामुळे भाजपने पवार गटाला फारसे महत्त्व दिलेले नाही. नवाब मलिक यांच्यावर भाजपचा आक्षेप होता त्याच मलिक यांच्या भावासह तीन नातेवाईकांना पहिल्या यादीत उमेदवारी देण्यात आली आहे. अल्पसंख्याक बहुल प्रभागांमध्ये मतांच्या विभाजनासाठी भाजपकडून अजित पवार गटाचा अप्रत्यक्षपणे उपयोग करून घेतला जाईल, अशी रणनीती असल्याचे सांगण्यात येते.

काँग्रेस आणि ठाकरे यांच्या शिवसेनेकडे मुंबईतील जाणारी मुस्लीम मते वळवण्यासाठी अजित पवार यांची राष्ट्रवादी मुंबईत स्वबळावर निवडणुका लढवत आहे, असा आरोप काँग्रेसने मध्यतंरी केला होता. राष्ट्रवादी उमेदवारांच्या आजच्या यादीतील ३७ उमेदवारांमध्ये तब्बल १० उमेदवार अल्पसंख्याक (मुस्लीम) समाजातील आहेत. यापूर्वी राष्ट्रवादीने अल्पसंख्याक उमेदवारांना प्राधान्य दिले नव्हते. राष्ट्रवादीच्या पुढच्या यादीमध्येही अल्पसंख्याक उमेदवारांचा भरणा मोठा असल्याचे समजते.

यादी जाहीर करण्यापूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई महापालिकेत गटनेते धनंजय पिसाळ यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रभाग १११ मधून पिसाळ यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय शरद पवार गटाचे पदाधिकारी मनीष दुबे यांनीही अजित पवार गटात प्रवेश केला असून, त्यांना प्रभाग क्र. ३ मधून उमेदवारी देणअयात आली आहे. २०१७ मध्ये राष्ट्रवादीचे मुंबई महापालिकेत ७ नगरसेवक निवडून आले होते. राष्ट्रवादीची मुंबईत विशेष संघटन नाही. नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक-शेख या पक्षाच्या एकमेव आमदार आहेत.

कुटुंबातील तीन उमेदवार नवाब मलिक यांच्या कुटुंबातील तिघांना पहिल्या यादीत उमेदवार म्हणून स्थान देण्यात आले आहे. नवाब मलिक यांचा सख्खा भाऊ कप्तान मलिक, बहिण डॉ. सईदा खान, नातेवाईक बुशरा परवीन मलिक यांचा उमेदवारांच्या नावामध्ये समावेश आहे.