मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये झालेल्या मृत्यूप्रकरणी तीन संस्था चौकशी करत आहेत. या चौकशा गतीने सुरू असून त्यामध्ये कोणतीही उणीव राहणार नाही. चौकशा पूर्ण झाल्यानंतर विमान अपघातासंदर्भातील नेमकी वस्तुस्थिती समोर येईल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले. विरोधकांनी अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात २९३ चा प्रस्ताव चर्चेला आणला होता.
२८ जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमानास झालेल्या अपघाताची चौकशी नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए), हवाई अपघात तपास शाखा (एएआयबी) आणि पोलिसांचा गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) या तीन संस्था करत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतर अपघातासंदर्भातील सत्य समोर येईल, असे मंत्री शेलार म्हणाले.
अजित पवार यांचा भ्रमणध्वनी सुरक्षित आहे. त्यांचे जॅकेट अर्धेच जळाले होते. त्यांचे घड्याळही सुस्थितीत आहे. मग, विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ कसा काय जळाला? विमानाच्या सिग्नलमध्ये कोणी अडथळे आणले का? विमानात स्फोट प्रथम झाला आणि ते खाली कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत. आमच्या नेत्याला न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहील. आमच्या पक्षाने विमान अपघाताची चौकशी केंद्रीय तपास संस्थेकडून (सीबीआय) करण्याबाबत निवेदन सरकारला पूर्वीच दिलेले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे म्हणाले. या प्रस्तावावर बोलताना तुपे यांना रडू कोसळले.
सुनील प्रभू, दीपक केसरकर, डॉ. नितीन राऊत या सदस्यांनी अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भातील शंका दूर करण्याची मागणी केली. अजित पवार हे विमानतळापर्यंत पोहोचतेवेळी असलेल्या वाहतूक कोंडीचा तपास करावा, असे निर्देश तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी दिले. विरोधी व सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येकी दोन प्रस्तावांवर एकत्र चर्चा झाली. चर्चेवेळी सभागृहात केवळ एक मंत्री उपस्थित असल्याबाबत काँग्रेसच्या नाना पटोले यांनी खंत व्यक्त केली.
अपघात नव्हे घातपात : नाना पटोले
अजित पवार यांच्या विमानाचा अपघात हा घातपात आहे. या घटनेसंदर्भात सरकारने दिशाभूल करणारे कथानक पुढे आणले आहे. या अपघातामुळे केंद्र व राज्य सरकारवरील जनतेचा विश्वास संपुष्टात आला आहे, असे आरोप करत काँग्रेसच्या नाना पटोले यांनी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत विमान अपघाताची चौकशी करावी, अशी मागणी केली.
