मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर बारामती विमानतळाच्या सुरक्षेबाबत आणि येथील हवाई प्रशिक्षण संस्थेच्या विकासाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र, सुनेत्रा पवार यांनी खासदार म्हणून बारामती विमनातळाबाबत काही अतारांकित प्रश्न राज्यसभेत उपस्थित केले होते, नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सुमित्रा पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना लेखी उत्तर दिले. त्यातून काही महत्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याचबरोबर राज्यशासनाचाच लालफितीचा कारभाराचाच फटका उपमुख्यमंत्र्यांना बसल्याचे दिसते आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघात निधन झाले. पवार हे ‘बॉम्बार्डियर एरोस्पे“ या कॅनडास्थित कंपनीच्या ‘लिअरजेट ४५’ या विमानाने मुंबई ते बारामती असा प्रवास करत होते. हे विमान बारामती विमानतळावर धावपट्टीपासून काही अंतरावर कोसळून त्यात पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बारामती विमानतळ चर्चेत आले होते.

बारामती विमानतळाबाबत सुनेत्रा पवार यांचे प्रश्न काय ?

बारामती विमानतळाला नागरी विमान वाहतुकीशी जोडण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘उडान’ प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत माहिती मिळावी तसेच बारामतीतील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी (कृषी उडान ) रात्रीच्या वेळी विमान उतरविण्याची सुविधा आणि विकास करण्याच्या नियोजनाबाबत सुनेत्रा पवार यांनी प्रश्न विचारले होते. तसेच बारामती येथील विद्यार्थ्यांना हवाई क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने बारामती येथे असलेल्या हवाई प्रशिक्षण केंद्राला अद्यावत करण्यासाठी काही विशेष निधीची तरतूद केली आहे का किंवा कोणत्या प्रकल्पाअंतर्गत त्याचा विकास होणार आहे याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

राज्य शासनाकडे दोन वर्षांपूर्वीच प्रस्ताव ?

नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या उत्तरानुसार, फेब्रुवारी २०२४ मध्येच बारामती विमानतळाच्या विकासासाठी जागेच्या उपलब्धतेबाबत आणि त्यासाठी आवश्यक परवानगी देण्याबाबत राज्य शासनाकडे विनंती करण्यात आली होती. मात्र, त्याबाबत अजूनही कोणताही प्रतिसाद प्राप्त मिळालेला नाही. असे उत्तरात नमूद करण्यात आले आहे. बारामती विमानतळावरील धावपट्टी ही केंद्राच्या ‘उडान’ योजनेअंतर्गत अनारक्षित विमानतळाच्या यादीत असून यासाठी निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. याबाबत उडान ५.२ योजनेअंतर्गत बारामती येथील धावपट्टीसाठी काही निविदाही प्राप्त झाल्या आहेत. असा उल्लेखही उत्तरात करण्यात आला आहे.

बारामती येथील वैमानिक प्रशिक्षण केंद्राचा विकास लांबणीवर ?

बारामती येथील युवकांना वैमानिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी वैमानिक प्रशिक्षण केंद्राच्या विकासाबाबतही प्रश्न सुनेत्रा पवार यांनी उपस्थित केला होता. मात्र, सध्या तरी असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे उत्तरात म्हटले आहे. त्यामुळे बारामती विमानतळ आणि वैमानिक प्रशिक्षण संस्थेचा विकास लांबणीवर पडणार असल्याचे दिसते आहे.