राज्यातील दुष्काळाचे अर्थसंकल्पात प्रतिबिंब

दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देण्यासाठी उपाययोजना केलेला आणि त्यासाठी काही वस्तूंवरील करात पुढील एका वर्षासाठी वाढ सूचविणारा सन २०१३-१४चा राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी बुधवारी विधानसभेत सादर केला.

दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देण्यासाठी उपाययोजना केलेला आणि त्यासाठी काही वस्तूंवरील करात पुढील एका वर्षासाठी वाढ सूचविणारा सन २०१३-१४चा राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी बुधवारी विधानसभेत सादर केला. सुमारे सव्वा तासाच्या अर्थसंकल्पीय भाषणात अजित पवार यांनी अधूनमधून बहिणाबाईंसह इतर कवींच्या कवितांच्या ओळी वाचून सत्ताधाऱयांसह विरोधकांच्या चेहऱयावर हास्य फुलवले. 
संपूर्ण मराठवाडा, विदर्भातील काही जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुक्यांमध्ये यावर्षी मोठा दुष्काळ आहे. अनेकांना दुष्काळामुळे गाव सोडून शहराकडे स्थलांतर करावे लागले आहे. गुरांना जगविण्यासाठी अनेक ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुढील आर्थिक वर्षासाठी सादर करण्यात येणाऱया राज्याच्या अर्थसंकल्पात दुष्काळाचे प्रतिबिंब उमटेल, याची आधीपासून शक्यता वर्तविण्यात आली होती.
अजित पवार यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच राज्यात दुष्काळाचे संकट तीव्र असल्याचा पुनरुच्चार केला तसेच अर्थसंकल्पात दुष्काळ निवारणासाठी सर्वाधिक तरतूद करण्यात आली असून जास्त निधी त्याच कामावर खर्च करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. टंचाईग्रस्त जनतेसाठी निधी कमी पडू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदी
शेतकऱयांना कमी दरात वीज देण्यासाठी ३२०० कोटींची तरतूद
माजी मुख्यमंत्री दिवगंत वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद
शेतकऱयांना खतांसाठी ५३ कोटी रुपयांची तरतूद
चारा विकास कार्यक्रमासाठी ४३ कोटींची तरतूद
जेट्टी विकासासाठी १०२ कोटी रुपयांची तरतूद
राजीव गांधी जीवनदायी योजना संपूर्ण राज्यात राबविणारा असून, त्यासाठी ३२५ कोटी रुपयांची तरतूद
मासळी साठवणुकीसाठी ३७ कोटी रुपयांची तरतूद
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी ७११ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद
आरोग्य केंद्रांच्या बांधकामासाठी ४७७ कोटी रुपयांची तरतूद
मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी शाळेच्या परिसरात वसतीगृह बांधण्यासाठी १०० कोटींची तरतूद
शिक्षकांना वेतनेतर अनुदान देण्यासाठी २६६ कोटी रुपये
पिण्याच्या पाण्यासाठी २०० कोटी रुपये
माहिती-तंत्रज्ञान विषय शिकवण्यासाठी ११३ कोटी रुपये राज्य सरकारची तरतूद
राज्य युवा धोरणासाठी १५० कोटी रुपयांची तरतूद
राज्यातील रस्ते चौपदरीकरणाचे १२ प्रकल्प विचाराधीन
रस्त्यांच्या विकासासाठी दोन हजार ७१६ कोटी रुपयांची तरतूद
विविध वीज निर्मिती प्रकल्पांसाठी १९६ कोटींची तरतूद
अपारंपारिक ऊर्जास्रोतांसाठी ८० कोटी रुपयांची तरतूद
महाराष्ट्र औद्योगिक धोरण २०१३ अंमलबजावणीसाठी १२३ कोटी रुपये
नागपूरमधील मिहान प्रकल्पासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद
महापालिकांच्या हद्दवाढ झालेल्या भागांतील सोयीसुविधांसाठी २० कोटी रुपये
मुंबईतील मोनो रेलचा दुसरा टप्पा २०१४पर्यंत पूर्ण होईल
सर्व शिक्षा अभियनासाठी ७११ कोटी रुपयांची तरतूद
नागपुरातील ताजबागसाठी २० कोटींची तरतूद
वर्ध्यातील सेवाग्रामसाठी ३० कोटी रुपये
शालेय पोषण आहारासाठी एक हजार २६४ कोटी रुपयांची तरतूद
किशोरवयीन मुलींच्या सक्षमीकरणासाठी ११० कोटींची तरतूद
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी ७८७ कोटींची तरतूद
अल्पसंख्याक समाजातील युवावर्गाच्या योजनांसाठी २८० कोटींची तरतूद
आश्रमशाळा बांधकामासाठी ५०१ कोटी रुपये प्रस्तावित
आधुनिक बारकोडेड शिधापत्रिका देण्यासाठी १३ कोटी प्रस्तावित
संग्रहालयांच्या संवर्धनासाठी ३७ कोटी रुपये तरतूद
मोठ्या शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी १५० कोटी रुपयांची तरतूद
पोलिसांच्या निवासस्थानासाठी आणि ठाण्यांसाठी १८८ कोटी रुपये
राज्यात ५८४ नवीन गोदामे बांधणार
माळढोक अभयारण्यासाठी १० कोटी रुपये

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ajit pawar presented maharashtras budget in state assembly

ताज्या बातम्या