राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला १४४ जागा देण्यात याव्यात, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसपेक्षा दोन जास्त जागा जिंकण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे राज्यातील विधानसभेच्या एकूण २८८ जागांपैकी १४४ जागा राष्ट्वादीसाठी सोडण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी अजितदादांनी केली. लोकसभा निवडणुकीचा निकाल बघता राज्यामध्ये काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची कामगिरी चांगली झाली असल्यामुळे गेल्यावेळच्या जागावाटपाच्या सुत्रात बदल करण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून मांडण्यात आला. यापूर्वी राष्ट्रवादीने जास्त जागांची मागणी केल्यास काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवर बोट ठेवण्यात येत असे. त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून काँग्रेसला याच गोष्टीची आठवण करून दिली जात आहे.