मुंबई : नको त्या गोष्टी पुढे आणून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कुणी करू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. सर्व जाती धर्माना बरोबर घेऊन जाणारा महाराष्ट्र आहे, त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडला तर ते राज्याला परवडणारे नाही, असा इशाराही त्यांनी भाजप व मनसे यांना त्यांचे नाव न घेता दिला.

माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिवर्धकाच्या वापराबाबतची आधीच नियमावली जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी यांनी काय करावे, हा त्यांचा अधिकार आहे. आपण महाराष्ट्रात राहतो, जाती धर्माना एकत्र घेऊन जाणारे हे राज्य आहे, त्यामुळे राज्यात सामाजिक शांतता राखणे महत्त्वाचे आहे.

केंद्राकडून अपेक्षित निधी नाही

मुंबईतून  इथून खूप मोठय़ा प्रमाणात कर देशाला जातो, हे निर्विवाद सत्य आहे. त्या तुलनेत राज्याला जेवढा निधी मिळायला हवा, तेवढा मिळत नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे. वन नेशन, वन टॅक्स ही संकल्पना जीएसटीच्या निमित्ताने पुढे आली. त्यामुळे केंद्र सरकारने देखील पेट्रोल-डिझेलवर कर लावताना एक मर्यादा आखून दिली, तर सर्व राज्ये त्याबद्दल निर्णय घेऊ शकतात, असे पवार म्हणाले.