मुंबई : मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे अजित रावराणे हे एकमेव नगरसेवक निवडून आले असून महापौर निवडीच्या या राजकारणात ते काय भूमिका घेतात याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. मात्र मी शरद पवारांचा भक्त असून शेवटपर्यंत त्यांच्यासोबतच राहणार, मी कधीही पक्ष बदलणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र गट स्थापन करतील असेही ठरले होते असाही गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत शिवसेना (ठाकरे), मनसे आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाची युती होती. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवलेल्या उमेदवारांपैकी मालाड येथील प्रभाग क्रमांक ४३ मध्ये अजित रावराणे हे निवडून आले आहेत. अजित रावराणे हे शरद पवार यांच्या पक्षाचे एकमेव नगरसेवक मुंबई महापालिकेत आहेत. मुंबई महापालिकेत निवडून आलेल्या सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी आपली गटनोंदणी केली आहे. मात्र अजित रावराणे यांनी आपली नगरसेवक म्हणून आपली एकट्याची स्वतंत्र नोंदणी आधीच केली आहे. सत्ता स्थापनेच्या गणितात रावराणे हे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
अजित रावराणे यांनी सांगितले की, मला विविध पक्षांकडून पक्ष प्रवेशासाठी संपर्क साधला जात आहे. पण मी शरद पवार यांचा भक्त आहे. मी त्यांच्या पक्षात आहे आणि पुढेही त्यांच्याच पक्षात राहणार आहे. माझ्या पक्षाची कितीही पडझड झाली किंवा नाही झाली तरी मी याच पक्षात राहणार आहे. पण मी ज्या प्रभागातून निवडून आलो त्या प्रभागासाठी निधी मिळावा याकरीता मला कोणाला समर्थन द्यावे लागणार असले तर त्याबाबत मी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून निर्णय घेईन असेही रावराणे यांनी स्पष्ट केले आहे.
निवडणूकीनंतर एकत्र येण्याचे ठरले होते…..
गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. त्यावरून मोठे राजकारण सुरू आहे. विलीनीकरणाच्या चर्चा आधीपासून सुरू होत्या असा दावा शरद पवार गटाकडून केला जात आहे. तसेच दोन्ही गटांचे विलीनीकरण व्हावे ही अजित पवार यांची इच्छा होती असाही दावा केला जात आहे. तर अजित पवार यांच्या गटाकडून याबाबत काहीही भाष्य केले जात नाही. अशा गोंधळाच्या स्थितीत आता रावराणे यांनीही आपले मत व्यक्त केले आहे. पालिका निवडणूकीनंतर दोन्ही गटांच्या नगरसेवकांचा एकच गट स्थापन करण्याचे ठरले होते असे त्यांनी सांगितले. मात्र अजित पवार गटाच्या तीन नगरसेवकांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते पण मी माझ्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

